वाहतूक ठप्प
रत्नागिरी : तालुक्यातील पावस - गोळप परिसरात मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे रनपार येथील जुनाट वडाचे झाड कोसळल्याने रस्ता वाहतुकीला बंद झाला होता. पूर्णगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश गावीत यांनी सहकारी व ग्रामस्थांच्या मदतीने झाडाच्या फांद्या तोडून बाजूला करुन मार्ग वाहतुकीसाठी मोकळा केला.
रस्त्याची दुरवस्था
चिपळूण : शहरातील मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गाची दुरवस्था झाली आहे. खड्डेमय रस्त्यातून प्रवास करणे अवघड बनले आहे. वाहनचालकांना खड्ड्यातून वाहन नेताना कसरत करावी लागत आहे. पाग पॉवर हाऊस ते बहादूर शेख नाका दरम्यानही खड्डे पडले आहेत. गुहागर - विजापूर मार्गाचे रुंदीकरण व चौपदरीकरणाचे काम सुरु आहे.
शिक्षकांचा मेळावा
दापोली : येथील ए. जी. हायस्कूलमधील माजी शिक्षकांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. ए. जी. प्रशालेतील परिवारातर्फे ज्येष्ठ सदस्यांचे स्वागत मुख्याध्यापक सतीश जोशी यांनी केले. शालेय प्रशासन डिजिटल वर्गाची माहिती देण्यात आली. मुख्याध्यापक सतीश जोशी यांचा सत्कार यावेळी करण्यात आला.
रक्तदान शिबिर
दापोली : तालुक्यातील वडवली प्राथमिक आरोग्य केंद्रात सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान पालगड विभाग व स्थानिक ग्रामस्थांतर्फे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. माजी आमदार संजय कदम यांच्या उपस्थितीत यावेळी नागरिकांना मास्कचे वाटप करण्यात आले. युवती तालुका अध्यक्ष मृणाली साळवी, युवक अध्यक्ष योगेश महाडीक उपस्थित होते.
विसर्जनास मनाई
दापोली : शहरातील सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन गिम्हवणेतील तेलीवाडी तलावात करण्यात येते. मात्र, यावर्षी या तलावाचे राज्य सरोवर संवर्धनातून सुशोभिकरण सुरु आहे. त्यामुळे शहरातील सार्वजनिक मंडळांनी यावर्षी तलावात गणेश विसर्जन करु नये असे पत्र नगर पंचायतीला ग्रामपंचायतीकडून देण्यात आले आहे.
काँग्रेसची स्पर्धा
रत्नागिरी : राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसतर्फे खड्डे चुकवा बक्षीस मिळवा या अनोख्या स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धेचे ठिकाण राम नाका ते राधाकृष्ण नाका, गोखले नाका, गाडीतळ, जेलरोड, डीएसपी बंगला, परटवणे, भूते नाका, काँग्रेस भवन असल्याचे नमूद केले असून विद्यार्थी काँग्रेसतर्फे सोशल मीडियावर स्पर्धेची पोस्ट फिरत आहे.
रक्तदान शिबिर
चिपळूण : गडकिल्ले संवर्धन क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या राजे सामाजिक प्रतिष्ठान मार्फत रक्तदान शिबिर आयोजित केले आहे. दिनांक २४ जुलै रोजी सकाळी ९ वाजता शिबिर श्री देव सोमेश्वर व श्रीदेवी करंजेश्वरी देवस्थान, भक्तनिवास येथे आयोजित केले आहे. तरी इच्छुकांनी शिबिरात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
धोके निवारा केंद्र
रत्नागिरी : चक्रीवादळ धोके निवारा केंद्र उभारणे तसेच धूप प्रतिबंधक बंधारे बांधणे, वीज अटकाव यंत्रणा बसविण्याची कामे करण्यात येणार आहेत. तालुक्यातील सतरा धूप प्रतिबंधक बंधाऱ्यांना मंजुरी मिळाली असून भूमिगत वाहिन्यांचा १९० कोटींचा प्रकल्प सुरु करण्यात आला आहे.
मार्गात बदल
मंडणगड : सावित्री नदीवरील आंबेत पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्याने मंडणगड तिडे तळेघर, नालासोपारा या बससेवेच्या मार्गात दिनांक १९ जुलैपासून बदल करण्यात आला आहे. ही बस मंडणगड येथून केळवत, कुंबळे, तिडे, आंबेत, गोरेगाव, लोणेरेमार्गे पनवेल व वसई फाटा मार्गे नालासोपारा येथे जाणार आहे. यामुळे एक तासाचे अंतर वाचणार आहे.