चिपळूण : शहरातील गोवळकोट तारा बौद्धवाडी येथील मोरीचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे गोवळकोट चर ते धक्का हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. येथील नगरपरिषदेच्या जॅकवेलला समस्या झाल्याने स्लॅब मोरी टाकण्याची मागणी होत होती. त्यानुसार हे काम सुरु झाले आहे.
गरजूंना मदत
राजापूर : हितवर्धक गुरव समाज मुंबई संस्थेच्या वतीने कोरोनाच्या अनुषंगाने समाज बांधवांसाठी वैद्यकीय मदत तसेच धान्यवाटप उपक्रम राबविण्यात आला. समाजातील गरजू व्यक्तींना तांदूळ, गहू, साखर, चणाडाळ, तेल आणि मीठ आदी वस्तूंचे किट देण्यात आले.
पोलिसांना मास्कचे वाटप
दापोली : शहरात लॉकडाऊन काळात अविरत सेवा बजावणाऱ्या पोलीस कर्मचारी आणि होमगार्ड यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने दापोली अर्बन बँकेतर्फे मास्कचे वाटप करण्यात आले. बँकेचे अध्यक्ष जयंत जालगावकर यांनी प्रत्येक नाक्यावर जाऊन पोलीस कर्मचाऱ्यांना मास्कचे वाटप केले.
पेरणीच्या कामाला वेग
सावर्डे : हवामान खात्याकडून १० तारखेपर्यंत मान्सून सक्रिय होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सध्या मान्सूनपूर्व पाऊस पडू लागला आहे. त्यामुळे रोहिणी नक्षत्राच्या मुहूर्तावर चिपळूण तालुक्याच्या शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली आहे. शहरासह ग्रामीण भागात पेरणीबरोबरच शेत नांगरणीलाही सुरुवात झाली आहे.
जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
चिपळूण : तालुक्यातील चिवेली येथील सुनील साळुंखे परिवाराच्या पुढाकाराने मुंबईतील दीप जनसेवा समितीच्या माध्यमातून काडवली बौद्धवाडी आणि रोहिदासवाडीतील गरजू ग्रामस्थांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाबद्दल ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
शिवराज्याभिषेक गुढी
दापोली : तालुक्यातील आगरवायंगणी ग्रामपंचायत कार्यालयासमोर शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त भगव्या रंगाच्या ध्वजाची गुढी उभारण्यात आली. कोरोनाच्या अनुषंगाने शासनाने जारी केलेल्या नियमांचे पालन करत सरपंच दर्शना पवार यांच्या हस्ते पूजन करून ही गुढी उभारण्यात आली.
शाळेत वृक्षारोपण
चिपळूण : नजीकच्या खेर्डी येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्रीय शाळा येथे पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण उपक्रम आयोजित करण्यात आला होता. जिल्हा परिषद सदस्य दिशा दाभोळकर, ग्रामपंचायत सदस्य राकेश दाभोळकर, रियाज खेरडकर, राजेश सुतार, प्रणाली दाभोळकर, रशिदा चौगुले आदी उपस्थित होते.
ग्रामसंवाद सरपंच संघ
रत्नागिरी : शासनाच्या विविध योजनांची माहिती सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांना उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यातील ९ तालुक्यांमधील सरपंचांची ग्रामसंवाद सरपंच संघ स्थापन करण्यात आला आहे. त्यासाठी प्रत्येक तालुक्याचे अध्यक्ष यांची निवड करण्यात आली आहे.
खुर्च्यांचे वाटप
दापोली : केकेव्हीएन्स वसुंधरा फाउंडेशनतर्फे दापोलीतील नवभारत छात्रालयात खुर्च्यांचे वाटप करण्यात आले. ग्रामीण भागातील गरीब व गरजू विद्यार्थी यांना शैक्षणिकदृष्ट्या मदत करण्यासाठी फाउंडेशनने हा उपक्रम राबविला. या वेळी फाउंडेशनचे सदस्य उपस्थित होते. या उपक्रमाबद्दल शाळेतर्फे फाउंडेशनचे आभार मानण्यात आले.
गाव तेथे लसीकरण
रत्नागिरी : सध्या जिल्ह्यात लसीकरण झालेल्यांची टक्केवारी अतिशय कमी आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता अधिकाधिक व्यक्तींचे लसीकरण होणे गरजेचे आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत गाव तेथे लसीकरण अशी मोहीम शासनाने राबवावी, अशी मागणी गावागावातून केली जात आहे.