देवरूख : फुणगूस रिक्षा स्टॅण्ड ते आरोग्य केंद्रापर्यंतच्या रस्त्याची दुरवस्था झाली असून, रुग्णांचे हाल होत आहेत. याकडे स्थानिक लोकप्रतिनिधी व आमदारांनी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. सुमारे ३ वर्षांपूर्वी या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. डांबरीकरणानंतर महिन्याच्या आतच रस्ता उखडला होता. याची कल्पना आमदार उदय सामंत यांंना देण्यात आल्यानंतर त्यांनी संबंधित ठेकेदाराला समज दिली; परंतु आजपर्यंत ठेकेदाराने रस्ता दुरुस्त केलेला नाही.
नियमांची अंमलबजावणी
पाचल : आगामी गणेशोत्सव कालावधीत पाचल बाजारपेठेत होणारी गर्दी लक्षात घेऊन पाचल ग्रामपंचायतीच्यावतीने परिसरातील वाहनधारकांसाठी नियम व अटी लागू करण्यात आल्या आहेत. गणेशोत्सवामध्ये येणाऱ्या मुंबईकर चाकरमान्यांमुळे पाचल बाजारपेठेत मोठी गर्दी होत असते. वाहतुकीचे नियम लागू केले आहेत. कोणत्याही वाहनाने नियमांचे उल्लघंन केल्यास दंड आकारण्यात येणार आहे.
मदतीचे वाटप
चिपळूण : महापुरानंतर मदतीपासून वंचित राहिलेल्या अपंग व्यक्तींना गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अलोरे येथील डाॅ. श्यामकांत गजमल यांनी मदतीचे वाटप केले. चिपळूण नगर परिषदेमध्ये आयोजित कार्यक्रमात तालुका अपंग सेवा संस्थेच्या सदस्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी अशोक भुस्कुटे, बारकू फुटक, शरीफ मुजावर, संतोष होळकर आदी उपस्थित होते.
प्रक्रिया प्रशिक्षण
दापाेली : ग्रामीण जागृती कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत दापोलीतील डाॅ. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठातील चतुर्थ वर्षातील विद्यार्थिनींनी महिला सबलीकरणाच्या उद्देशाने बचतगटातील महिलांना फळे व दुधापासून पदार्थ बनविण्याचे प्रात्यक्षिकातून प्रशिक्षण दिले व उपस्थित महिलांकडूनही प्रात्यक्षिक करून घेतले. विद्यार्थिनी सिद्धी रसाळ, रिंकी खळे, ऐश्वर्या भेकरे यांनी हा प्रशिक्षण कार्यक्रम राबवला.
दिव्यांगांना सराव शिबिर
खेड: जिल्ह्यातील दिव्यांग खेळाडूंना सर्वच खेळात संधी मिळवून देण्यासाठी दिव्यांग क्रिकेट असोसिएशन व पॅरा स्पोर्टस् ॲकॅडमी या जिल्हा संघटनेच्यावतीने क्रीडा मार्गदर्शन व सराव शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दिव्यांग खेळाडूंच्या राज्य व राष्ट्रीय स्पर्धांमध्ये महिला व पुरुष गटातील सर्व खेळाडूंना सर्व खेळाची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
आंबये तालुका अव्वल
खेड : महाआवास अभियान ग्रामीण उपक्रमांतर्गत आंबये ग्रामपंचायतीने तालुक्यात अव्वल स्थान पटकावले. पंचायत समिती सभापती मानसी जगदाळे व गटविकास अधिकारी सुशांत पाटील यांच्याहस्ते सरपंच तुकाराम सकपाळ व सदस्यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी माजी सभापती, उपसरपंच, ग्रामस्थ व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.