शैक्षणिक वर्ष पूर्ण
रत्नागिरी : कृषी अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रियेची चाैथी फेरी महाविद्यालयीनस्तरावर पार पडल्यानंतर यांच्या अभ्यासक्रमाचे शिक्षण सत्र एप्रिलपासून सुरू झाले आहे. प्रत्येकी २० आठवड्यांच्या दोन सत्रांत येत्या डिसेंबरमध्ये शैक्षणिक वर्ष पूर्ण करण्यात येणार आहे.
सातवा वेतन आयोग लागू
रत्नागिरी : सामाजिक न्याय विभागांतर्गत दिव्यांग कल्याण आयुक्तालयांच्या अधिपत्याखालील अनुदानित शाळेतील ४ हजार ८९९ शिक्षक व ६ हजार १५९ शिक्षकेत्तर कर्मचारी अशा एकूण ११ हजार ५८ कर्मचाऱ्यांना दि. १ जानेवारी २०१६ पासून सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार आहे.
परवाना प्रक्रियेला ब्रेक
रत्नागिरी : खासगी वाहनांच्या नोंदणीस दि. १ मेपर्यंत स्थगिती देण्याचे आदेश परिवहन आयुक्त कार्यालयाने दिले आहेत. या आदेशानुसार नव्याने वितरित होणारे लर्निंग व ड्रायव्हिंग लायसन्सची प्रक्रिया दि. ३० एप्रिलपर्यंत स्थगित करण्यात आली आहे.
पासपोर्ट कार्यालय बंद
रत्नागिरी : कोरोना रुग्णसंख्या वाढीमुळे राज्यात लाॅकडाऊन घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे पासपोर्ट कार्यालयही दि. ३० एप्रिलपर्यंत बंद राहणार आहे. राज्य शासनाच्या ‘ब्रेक द चेन’ आवाहनास प्रतिसाद म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
यांत्रिकीकरण योजना प्रक्रिया पूर्ण
रत्नागिरी : कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या विविध योजनांसाठी अनुदान मिळवण्यासाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांची ऑनलाइन लाॅटरी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या योजनेत जिल्ह्यातील तीन हजार ६०० शेतकऱ्यांना एसएमएसद्वारे कळविले आहे.
श्रमसाफल्य योजनेचा लाभ
रत्नागिरी : डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने सुरू असलेल्या योजनेचा लाभ चतुर्थश्रेणी कर्मचारी, सफाई कामगारांना मिळावा, अशी मागणी भाजपचे भटक्या विमुक्त जाती-जमाती जिल्हा संयोजक नीलेश आखाडे यांनी केली आहे.
कोरोनावाढीचा धसका
रत्नागिरी : शहरातच नव्हे तर ग्रामीण भागातही कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनारुग्णवाढीचा धसका वयोवृद्धांनी जास्त घेतला असून, घराबाहेर पडणे टाळत आहेत. मात्र जे वयोवृद्ध एकटे राहत आहेत, त्यांना अत्यावश्यक वस्तू आणण्यासाठी बाहेर पडणे अवघड झाले आहे.
श्रमदानातून खड्डे बुजविले
राजापूर : तालुक्यातील नाटे ते जैतापूर मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले होते. वेळोवेळी मागणी करूनही खड्डे न बुजविल्यामुळे अखेर माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या कार्यकर्त्यांनी श्रमदानातून खड्डे बुजविले आहेत.