रत्नागिरी : गेले आठवडाभर मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे रत्नागिरी तालुक्यातील वरवडे-गणपतीपुळे मार्गावरील तिवरी बंदर मोरीवर भलामोठा खड्डा पडला आहे. यामुळे हा रस्ता वाहन चालवण्यास धोकादायक बनला असून, वाहनचालकांनी प्रवास करताना खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
शिक्षकांत नाराजी
देवरुख : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर शालेय शिक्षण विभागाने कोरोनामुक्त असलेल्या ठिकाणी ८ वी ते १० वी सुरू करण्याचा निर्णय घेतला. या शासन निर्णयानुसार शिक्षक नियमित कामकाजाला जात असलेल्या शाळेत विद्यार्थी येण्यापूर्वी शिक्षकांची आरटीपीसीआर टेस्ट करण्याचे नमूद करण्यात आले आहे. यावर सध्या शिक्षक वर्गातून नाराजी व्यक्त होत आहे.
पोसरे ग्रामस्थांना मदत
रत्नागिरी : रत्नागिरीतील तालुक्यातील बौद्धजन पंचायत शाखा रत्नागिरी व वाटद जिल्हा परिषद गट यांच्या संयुक्त विद्यमाने बौद्धजन पंचायतीचे तालुकाध्यक्ष प्रकाश पवार आणि माजी सभापती, जिल्हा परिषद सदस्य ॠतुजा जाधव यांच्या नेतृत्वाखाली अनेक कार्यकर्त्यांनी खेड तालुक्यातील पोसरे बौद्धवाडी येथील आपद्ग्रस्तांना भेटून मदत केली.
भाजपतर्फे आपत्ती निवारण कक्ष
चिपळूण : तालुक्यातील महापुराची स्थिती निवारण्यासाठी चिपळूण भाजपा आपत्ती निवारण कक्ष ब्राह्मण सहायक संघ येथे स्थापन करण्यात आला आहे. या आपत्ती कक्षाचे प्रमुख केदार साठे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आपत्ती निवारण्यासाठी वस्तूरूपी मदत देण्याची इच्छा असेल किंवा प्रत्यक्ष श्रमदान करण्याची इच्छा असेल, त्यांनी प्रमुखांशी संपर्क करून मदत करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
पेट्रोल देण्याची मागणी
पाली : गेल्या आठवड्यात अतिवृष्टीमुळे आंबा घाट बंद असल्याचा परिणाम पेट्रोल व डिझेल पुरवठ्यावर झाला आहे. त्यामुळे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनाही पेट्रोल नाकारले जात असल्याने त्यांना गावपातळीवर काम करण्यास व पाणीपुरवठा करण्यास अडचण येत आहे. पुरवठा विभागाने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना पेट्रोल पुरवठा सुरू करण्याची मागणी होत आहे.
लोकशाही दिन २ ऑगस्टला
रत्नागिरी : दर महिन्याला पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात होणारा लोकशाही दिन २ ऑगस्ट २०२१ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रत्यक्षात न होता दूरचित्रवाणीच्या माध्यमातून दुपारी १ ते २ वाजता या वेळेत होणार आहे. नागरिकांनी प्रथम तालुका लोकशाही दिनात अर्ज सादर करणे बंधनकारक आहे.
बस सुरू
दापोली : लाॅकडाऊनमुळे बंद करण्यात आलेली माटवण-वडवली बस अखेर पुन्हा सुरू करण्यात आली आहे. ही बस लाॅकडाऊन शिथिल झाल्यानंतरही बंद होती. यामुळे ग्रामस्थ, विद्यार्थी यांना त्रास होता. त्यामुळे वडवली येथील सखाराम महाडिक यांनी निवेदन दिले होते. या निवेदनाद्वारे बस चालू करण्यात आली आहे.
शेतकरी मेळावा
खेड : आंबवली विभागातील कुळवंडी येथे तालुका कृषी कार्यालय व नवसंजीवनी ग्रामविकास संस्था कुळवंडी यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी मेळावा पार पडला. यावेळी दापोलीतील उपविभागीय कृषी अधिकारी दीपक कुटे यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक व शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.
खेडसाठी रुग्णवाहिका
खेड : शहरातील रुग्णांना तातडीने उपचार मिळावेत, याकरिता शिवतेज आरोग्य सेवा संस्थेकडून रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली आहे. या रुग्णवाहिकेचे लोकार्पण आमदार योगेश कदम व जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी युवासेना राज्य कार्यकारिणी सदस्य सिद्धेश कदम, माजी जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, सदस्य अरुण कदम, पंचायत समिती सभापती मानसी जगदाळे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.