चिपळूण : कुंभार्ली घाटातील रस्ता पावसाळ्यात ठिकठिकाणी वाहून गेला आहे. अनेक ठिकाणी वळणावर खोल आणि लांबच्या लांब खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे कुंभार्ली घाट रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून तयार केलेला रस्ता काही महिन्यातच उखडल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून झालेल्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. तूर्तास या घाट रस्त्यातील खड्ड्याच्या समस्येमुळे वाहतूकदार हैराण झाले आहेत.
गुहागर -विजापूर मार्गावरील हा घाट कोकण व पश्चिम महाराष्ट्राला जोडतो. १८ कि.मी. लांबीच्या घाटरस्त्यात अनेक नागमोडी वळणे आहेत. पावसाळ्यात घाटात अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या. मोठ्या दरडी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हटवण्यात आल्या. मात्र अनेक ठिकाणी दरडींची माती नाल्यात टाकून नाले बुजवण्यात आले आहेत. पावसाळा संपल्यानंतर रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाढलेले गवत काढण्याची खरी गरज आहे. या गवतामुळे रात्रीच्यावेळी समोरून येणारे वाहन आणि साईडपट्टी समजत नाही. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे.
पोफळीपासून सोनपात्राच्या अलीकडील रस्त्याचे जून २०२१ मध्ये डांबरीकरण करण्यात आले. मात्र पावसाळा सुरू झाल्यानंतर हा रस्ता उखडला आणि जागोजागी खड्डे पडले. काही ठिकाणी खडी बाहेर आल्यामुळे या खडीवरून घसरून दुचाकींचे अपघात झाले. सोनपात्रासह घाटातील पाच ते सहा ठिकाणच्या वळणावर रस्ता चक्क वाहून गेला आहे, तर काही ठिकाणी रस्त्याच्या मध्यभागी अडीच ते तीन फूट रुंदीचे मोठे चर पडले आहे.
पोफळीपासून पुढे ८ कि.मी.चा मार्ग अत्यंत धोकादायक झाला आहे. वळणावरील रस्ता वाहून गेल्यामुळे वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. वळणावर दोन गाड्या समोरासमोर आल्या, तर एक वाहन पुढे गेल्याशिवाय दुसरे वाहन काढता येत नाही. एखाद्या चालकाने बाजू काढत पुढे जाण्याचा प्रयत्न केला तर त्याचे वाहन उलटण्याचे प्रकार घडत आहेत. सोनपात्रा येथील वळणावर रस्त्याची अत्यंत वाईट अवस्था झाली आहे. येथे मालवाहू वाहने उलटण्याचे प्रकार अनेकदा घडले. या प्रकारामुळे वाहतूककोंडीलाही सामोरे जावे लागले.
सोनपात्रा येथील वळणावर रात्री गाडी उलटल्यानंतर पहाट झाल्याशिवाय वाहतूक सुरू झाली नाही. त्यामुळे वाहनचालकांसह पोलिसांनाही त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.
कुंभार्ली घाटात रस्त्याची अवस्था फारच भयंकर झाले आहे. खराब रस्त्यामुळे रोज एक ना एक ट्रक नादुरुस्त होऊन घाट बंद होतो. गेले तीन वर्षे चिपळूण-कराड रस्त्याला आणि गेल्या वर्षभरापासून कुंभार्ली घाटाला कोणी आईबापच नाही. प्रशासकीय व्यवस्थेने इतकी नीच पातळी गाठलीय की, आता शिव्या द्यायच्या लायकीची पण राहिलेली नाहीये. सोमवारी रात्री कुंभार्ली घाटात असाच एक ट्रक खड्ड्यात मेन-लीप तुटल्यामुळे बंद पडला. दोन्ही बाजूला दोन-दोन किलोमीटर रांगा लागल्या होत्या. ही परिस्थिती पावसाळ्यात ठीक आहे, पण आता तरी उपाययोजना करायला हवी. - पांडुरंग कदम, चिपळूण