कर्मचाऱ्यांमध्ये समाधान
रत्नागिरी : मार्चपासून प्रलंबित राहिलेले अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन अखेर जमा झाले आहे. यासाठी कृती समितीने शासन स्तरावर पाठपुरावा केला असता त्यानुसार आठ दिवसांपूर्वी मार्चचे तर दोन दिवसांपूर्वी एप्रिलचे मानधन कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे.
खांब बदलण्याची मागणी
राजापूर : तालुक्यातील उपळे परिसरातील गंजलेले विद्युत खांब व लोंबकळत असलेल्या विद्युत तारा तसेच रस्त्यातील तसेच घरांना अडथळे ठरत असलेले पोल बदलण्याची मागणी ग्रामस्थांकडून वारंवार करण्यात येऊनदेखील त्याची दखल घेतली जात नाही. पावसाळा तोंडावर असल्याने पुढील अपघाताचा धोका टाळण्यासाठी तातडीने जीर्ण खांब व वाहिन्या बदलण्याची मागणी होत आहे.
जीवनावश्यक वस्तू वाटप
देवरुख : स्वराज्य संघटना कोकण या युवक संघटनेतर्फे कडवई पंचक्रोशीतील चिखली गावातील गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी संघटना अध्यक्ष अविनाश गुरव, सिद्धेश जाधव, विशाल शिवलकर, अक्षय मोहिते, प्रशांत बोंबले, सुयश गुरव यांनी गरजूंच्या घरी जाऊन साहित्य वाटप केले.
मोबाइल टॉवरची मागणी
आरवली : संगमेश्वर तालुक्यातील कुटगिरी येडगेवाडीसह राजीवली, रातांबी, पाचांबे, कुचांबे, कुंभारखणी, कुटरे, येगाव, मुरडव आदी गावांमध्ये मोबाइलची सेवा देण्यासाठी मोबाइल टॉवर उभारणीची मागणी करण्यात आली आहे. याबाबत ग्रामपंचायतीने भारत संचार निगमला पत्र दिले असून तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी होत आहे.
भरती प्रक्रिया
रत्नागिरी : रत्नागिरी टपाल विभागातील ग्रामीण डाकसेवकांची एकूण १९५ पदे रिक्त असून विविध प्रवर्गातून ती भरण्यात येणार आहेत. ग्रामीण डाकसेवक पदांसाठी भरती प्रक्रिया ऑनलाइन सुरू झाल्याने अर्ज ऑनलाइन करावयाचा आहे. २६ मेपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नवोद्योजकांसाठी वेबिनार
रत्नागिरी : महाराष्ट्रातील नवउद्योजकांना प्रशिक्षित करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणेतर्फे वेबिनार आयोजित केले आहे. दिनांक १८ ते २० मेअखेर दुपारी ३ ते ४ या वेळेत वेबिनार होणार असून विविध तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.
थांब्याची मागणी
रत्नागिरी : मडगाव ते नागपूर या सुरू असलेल्या विशेष रेल्वेला पेण, चाळीसगाव, जळगाव, शेगाव, मुर्तुझापूर या ठिकाणी अधिकृत थांबे देण्याची मागणी प्रवाशांमधून होत आहे. जिल्ह्यात अनेक कर्मचारी, अधिकारी नागपूर परिसरातील आहेत. त्यामुळे अधिकृत थांबे देऊन प्रवाशांची गैरसोय दूर करण्याची मागणी होत आहे.