कोरोना केंद्र सुरू
लांजा : लांजा व राजापूर तालुक्यांमधील कोरोना रूग्णांसाठी लांजा शहरात आयुष्यमान नर्सिंग होम येथे डी. सी. एस. सी. कोरोना हेल्थ केअर सेंटरचा प्रारंभ झाला आहे. या केंद्रात तीन आयसीयू बेडसह १२ ऑक्सिजन बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. यावेळी लांजाचे नगराध्यक्ष मनोहर बाईत, तहसीलदार समाधान गायकवाड उपस्थित होते.
लसीकरण केंद्राची पाहणी
रत्नागिरी : तालुक्यातील जाकादेवी प्राथमिक आरोग्य केंद्राला रत्नागिरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी डाॅ. सुदर्शन राठोड यांनी भेट देऊन लसीकरण केंद्राची पाहणी केली. आरोग्य केंद्रात बाहेरच्या व्यक्तीला येऊन कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करण्याची संधी देऊ नका, अशी सूचना केली.
पुलाचा कठडा धोकादायक
देवरूख : मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावरील संगमेश्वरजवळच्या ब्रिटीशकालिन सोनवी पुलाच्या रेलिंगला बांबूच्या काठीचा आधार देण्यात आला आहे. याठिकाणी वारंवार होणाऱ्या अपघातांनंतर पुलाचा धोका वाढला आहे. पादचारी तसेच वाहनांची वर्दळ सातत्याने सुरू असतानाही पुलाच्या दुरूस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
स्पर्धेत यश
रत्नागिरी : वरदान क्रीडा मंडळ, कडवईतर्फे तालुकास्तरीय मोबाईल फोटोग्राफी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत एकूण ५४ स्पर्धक सहभागी झाले होते. प्रसिद्ध सिने छायाचित्रकार अक्षय परांजपे यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. या स्पर्धेत विजयानंद शेट्ये यांनी प्रथम, तेजस कोल्लमपीरंबल यांनी व्दितीय, योगीराज खातू यांनी तृतीय क्रमांक मिळवला.
साहित्याची टंचाई
रत्नागिरी : तालुक्यातील पाली गावात दि. १ मेपासून सर्व दुकाने, आस्थापना बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याने हार्डवेअरची दुकानेही बंद आहेत. पाली परिसरात बांधकाम साहित्याची टंचाई जाणवत आहे. पावसाळ्याच्या तोंडावर घरांची कामे रखडली आहेत. अन्य गावातून जादा पैसे मोजून साहित्य आणावे लागत आहे.
विनय माळींचा सत्कार
खेड : लाॅकडाऊन काळात भावना, संवेदना व कल्पकता याची अप्रतिम बांधणी करून साैंदर्यनिर्मिती केल्यानंतर येथील चित्रकार विनय माळी यांचा महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघातर्फे गाैरवपत्राने सन्मान करण्यात आला आहे. त्यांच्या कलाकृती प्रेरणादायी व आनंददायी ठरल्याने हा सन्मान करण्यात आला.
सर्वेक्षण पूर्ण
आरवली : संगमेश्वर तालुक्यातील राजिवली गावात ‘माझी रत्नागिरी, माझी जबाबदारी’ या मोहिमेंतर्गत सर्व २८१ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले. ६४३ व्यक्तींची माहिती घेण्यात आली असून, सर्व व्यक्तींची ऑक्सिजन व तापमान पातळी तपासण्यात आली. सरपंच शमिका पाटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली.
सचिन तोडणकर यांचा सहभाग
दापोली : केंद्रीय आरोग्य मंत्रालयातर्फे राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आलेल्या सरपंच संवाद वेबिनारमध्ये कर्दे गावचे सरपंच सचिन तोडणकर सहभागी झाले होते. तोडणकर यांनी शोषखड्डे, व्यसनमुक्ती, नशाबंदी व कुऱ्हाडबंदीची मागणी केली. गावातील दूषित पाणी, हागणदारीमुक्त योजनेबाबत चर्चा केली.
शिक्षक संघातर्फे मदत
दापोली : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, दापोलीतर्फे तालुक्यातील सर्व होमगार्डसना मास्क, हॅण्डग्लोव्हज्, सॅनिटायझर स्प्रे किटचे वाटप करण्यात आले. तसेच कोरोना मृतदेहावर अंत्यसंस्कार करणाऱ्या नगर पंचायत कर्मचाऱ्यांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले, सुरक्षा किटचेही वाटप करण्यात आले.