खेड : तालुक्यातील पंधरागाव विभागातील वावे हॉस्पिटल ते मुसाड पेठ या रस्त्याचे पावसाळ्यापूर्वी काम करण्यात आले होते. हे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. या कामाची चौकशी करण्याची मागणी पंधरागाव विभागातील जनतेकडून करण्यात येत आहे.
कर उत्पन्नातून वीजबिले भरणार
चिपळूण : ग्रामपंचायतींच्या नळपाणी योजना व पथदीप वीजबिले देण्यासंदर्भात पंधराव्या वित्त आयोगातून रक्कम खर्च करण्याबाबत शासनाकडून आलेल्या आदेशात बदल करण्यात आले आहेत. आता ही बिलाची रक्कम ग्रामपंचायतींच्या कर उत्पन्नातून देण्याचे आदेश दिले आहेत.
आरोग्य कर्मचाऱ्यांचा सत्कार
गुहागर : कोरोना महामारीत न घाबरता घरोघरी जाऊन सेवा देणाऱ्या आरोग्य कर्मचारी व आशा सेविका यांचा सत्कार करण्यात आला. वेळणेश्वर जिल्हा परिषद गटाच्या सदस्य नेत्रा ठाकूर यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम करण्यात आला. यावेळी पदाधिकारी, डॉक्टर, आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या.
शेतकरी चिंतेत
आरवली : माखजन - आरवली परिसरात मागील पाच ते सहा दिवस पावसाने दांडी मारली होती. त्यामुळे भात लावणीच्या कामाला खीळ बसली आहे. पाण्याअभावी रखडलेल्या लावणीची कामे पंपाद्वारे पूर्ण करताना शेतकऱ्यांची दमछाक होत आहे. पावसाअभावी पाण्याची कमतरता भासत असल्याने शेतकरी चिंतेत आहे.
विकास मंडळ स्थापन करण्याची मागणी
राजापूर : निसर्गसौंदर्याचा वारसा रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यांना लाभला आहे. येथील पर्यटनस्थळांच्या ठिकाणी पायाभूत सुविधांसह अन्य विकास झाल्यास त्यातून पर्यटनाला अधिक चालना मिळणार आहे. त्यातून रोजगार निर्मितीही होणार आहे. पर्यटन विकासासाठी स्वतंत्र पर्यटन विकास महामंडळाची स्थापना करण्याची मागणी राष्ट्रवादीचे नेते अजित यशवंतराव यांनी केली आहे.