- पावसामुळे कामे करता आली नसल्याचे नगराध्यक्षांचे स्पष्टीकरण
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. शहरवासीयांसह वाहनचालकांना याचा त्रास होत आहे. नळपाणी योजनेचे काम चार वर्षे रखडल्याबद्दल भाजप नगरसेवक राजेश तोडणकर, समीर तिवरेकर, मुन्ना चवंडे यांनी सभागृहात प्रश्न उपस्थित केला असता, पीठासन अधिकारी तथा नगराध्यक्ष प्रदीप साळवी यांनी, मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात डांबरीकरणाची कामे सुरू झाली; परंतु तौक्ते चक्रीवादळानंतर पाऊस झाला. त्यानंतर पाऊस पडतच राहिल्याने रस्त्यांची कामे करता आली नसल्याचे सांगितले.
शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था, नळपाणी योजनेचे रखडलेले काम आणि छत्रपती शिवाजी स्टेडियम येथील तीन गाळ्यांच्या फेरनिविदा कमी रकमेत गेल्याचे मुद्दे भाजपच्या नगरसेवकांनी शुक्रवारी झालेल्या नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत उपस्थित केले. नगराध्यक्ष प्रदीप साळवी आणि आरोग्य समितीचे सभापती निमेश नायर यांनी भाजपच्या नगरसेवकांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. स्टेडियममधील गाळ्यांच्या विषयावरून भाजप नगरसेवक राजेश तोडणकर, सुशांत चवंडे, समीर तिवरेकर आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक राजन शेट्ये यांची शाब्दिक जुगलबंदी झाली.
नगराध्यक्ष प्रदीप साळवी यांनी नवीन नळपाणी योजनेचे काम वेगाने व्हावे, यासाठी नगर परिषदेकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र कोरोनामुळे कामामध्ये अडथळे निर्माण झाल्याचे सांगितले. या वर्षी उन्हाळ्यात शहराला पाणीटंचाई जाणवली नाही. नळपाणी योजनेचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी आपण पाठपुरावा करीत असल्याचे त्यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी स्टेडियममधील ४, ५, १५ क्रमांकांचे गाळे मागच्या लिलावात मोठ्या रकमेत गेले होते. मात्र ज्यांना हे गाळे मिळाले, त्यांनी त्या गाळ्यांची अधिमूल्य रक्कम (प्रीमियम) भरून ते ताब्यात घेतले नाहीत. फेरनिविदेत हे गाळे पूर्वीच्या लिलावातील रकमेपेक्षा कमी अधिमूल्य रकमेत गेले असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येकी आठ लाख २६ हजार ६० रुपयांच्या प्रीमियम रकमेमध्ये या गाळ्यांचा लिलाव झाला. पूर्वी हे गाळे यापेक्षा अधिक रकमेच्या बोलीने गेले होते. यांतील एक गाळा ७५ लाखांना, तर उर्वरित दोन गाळे २० लाखांपेक्षा अधिक प्रीमियम रकमेत गेला होता. मात्र ही प्रीमियम रक्कम इतकी कमी कशी झाली? असा प्रश्न भाजप नगरसेवकांनी उपस्थित केला. यावर आरोग्य समितीचे सभापती निमेश नायर यांनी फेरनिविदेची प्रक्रिया मागील सभेमध्ये झालेल्या ठरावाप्रमाणे झाल्याचे स्पष्टीकरण दिले.
सर्वसाधारण सभेत भुयारी गटारांच्या कामाचे सादरीकरण करण्यात आले. या कामाचा सव्वाशे कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून, तो प्रस्ताव पुढील सर्व मंजुरीसाठी पाठवून निधी मिळविण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे आरोग्य सभापती निमेश नायर यांनी सांगितले.
गेल्या रविवारी मुसळधार पावसामुळे मध्यरात्री पऱ्या व चाळीजवळची गटारे तुंबल्याने पाणी मुजावर चाळीतील घरांमध्ये गेले. गटार आणि पऱ्यावर असलेल्या खोक्यांमुळे पऱ्या आणि गटारांची सफाई करता येत नाही. भविष्यात पाणी तुंबण्याची घटना घडू नये यासाठी गटार आणि नाल्यावरचे खोके हलविण्याची मागणी करण्याचे पत्र नगरसेवक विकास पाटील यांनी नगराध्यक्ष साळवी यांना दिले. त्यावेळी शहरातील सर्वच ठिकाणी अशी भूमिका घेतली जावी, असे आरोग्य सभापती निमेश नायर यांनी सूचित केले.