रत्नागिरी : शहरातील वाढत्या अतिक्रमणावर निर्बंध आणण्यासाठी नगर परिषदेने सभागृहात सर्वानुमते ठराव घेऊन अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली आहे. गेला आठवडाभर अतिक्रमण हटाव मोहीम सुरू आहे. रस्ते, फुटपाथवरील टपऱ्या, खोके, हातगाड्या हटविण्यात आल्या असून, मुख्य तसेच अंतर्गत रस्त्याकडेला वाहतुकीस अडसर ठरणारे फलक, होर्डिंग्ज, जाहिरातीच्या पाट्या हटविण्यात आल्या आहेत.साळवी स्टॉप ते मांडवीपर्यतचा रस्ता, फूटपाथ टपऱ्या, खोक्यांनी काबीज केल्याने नागरिकांमधून तक्रारी वाढत होत्या. गेल्या आठवड्यात ९६ टपऱ्या , खोके व ६७ होर्डिंग्ज हटविण्यात यश आले आहे. अधिकारी, कर्मचारी अतिक्रमण हटाव मोहिमेत सहभागी झाले असून, खोके, टपऱ्या हटविल्याने रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे.नगर परिषद करणार सर्वेक्षणशहरातील आठवडा बाजार, मंगळवार बाजार, मासळी मार्केट, मिरकरवाडा आदी महत्वाच्या ठिकाणी मर्यादित टपऱ्या किंवा वडापावची गाडी टाकण्याची परवानगी शिवाय एकाच आकारातील टपऱ्या तयार करून भाडेतत्वावर देण्याबाबतचा विचार सुरू आहे. त्याबाबत नगर परिषद सर्वेक्षण करणार आहे.माल रस्त्यावर आणू नयेशहरातील दुकानदार माल रस्त्यापर्यत लावत असल्याने वाहतुकीस अडसर ठरत आहे. शहरातील व्यापारी पेठ असलेल्या रामआळी, मारूती आळी, धनजीनाका, गोखलेनाका परिसरातील व्यापाऱ्यांनी विक्रीचा माल रस्त्यावर आणू नये. पादचारी, वाहनचालकांना त्रास होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशी सूचना करण्यात आली आहे.
शहरातील गर्दी कमी करण्यासाठी अतिक्रमणे हटविण्यात आली आहेत. मर्यादित टपऱ्या हातगाड्या महत्वाच्या ठिकाणी लावण्यासाठी परवानगी देण्याचा विचार सुरू आहे. तत्पूर्वी हा विषय सभागृहापुढे मांडून ठराव घेण्यात येणार आहे.- प्रदीप साळवी, नगराध्यक्ष