श्रीकांत चाळके -- खेड तालुक्यामधील ४० धनगरवाड्यांपैकी ११ धनगरवाड्यांमध्ये भीषण पाणीटंचाई जाणवत आहे़ प्रशासनाकडे या पाणीटंचाईला तोंड देण्यासाठी पुरेशी यंत्रणा उपलब्ध नसल्याचे यावेळी प्रकर्षाने समोर आले आहे. भौगोलिक परिस्थितीमुळे या वाड्यांना पाणी पुरवठा करणे अशक्य होत आहे. रस्ते आणि वाटादेखील येथे नसल्याने या वस्त्यांना पाणी पोहोचविणे अशक्य झाल्याचे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडून सांगण्यात येत आहे़ त्यामुळे या वस्त्यांना पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नांची आवश्यकता आहे़ खेड तालुक्यात गतवर्षी २५ गावे व ६६ वाड्यांना पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवले होते. यावर्षी एप्रिल महिन्यात १९ गावे आणि २४ वाड्यांना पाणीटंचाई जाणवत आहे तर उर्वरीत ११ धनगरवाड्यांमध्ये रस्ते आणि पायवाटा नसल्याने पाणीपुरवठ्यामध्ये व्यत्यय येत आहे.काही गावांना व वाड्यांना अद्याप तहसीलदारांचे पाणी पुरवठ्यासंबंधीचे दाखले प्राप्त न झाल्याने त्यांना पाणीपुरवठा होऊ शकलेला नाही. हे दाखले अद्याप तहसीलदारांच्या विचाराधीन असल्याचे समोर आले आहे.प्रत्येकवर्षी पाणीटंचाईची झळ विशेषत्वाने तालुक्यातील ४० धनगरवाड्यांना पोहोचते. चिरणी, तुळशी बुद्रुक, देवाचा डोंगर, तुळशी खुर्द कुबजाई, खवटी खालचीवाडी व वरचीवाडी, चिंचवली ढेबेवाडी, आंबवली, भिंगारा, कावळे, खोपी रेमजेवाडी, तळे व घेरारसाळगड येथील १२ धनगरवाड्यांमध्ये पाण्याचे मोठ्या प्रमाणावर दुर्भिक्ष्य आहे. येथील भौगोलिक परिस्थिती बेताची असल्याने या वाड्यांना पाणीपुरवठा करणे जिकरीचे होत आहे.धनगरवाड्या या बहुतांश डोंगराळ भागात वसल्या आहेत. गतवेळच्या तुलनेत यावर्षी या वाडयांना टंचाईची मोठी झळ पोहोचत आहे. पाण्याचे जवळपास साधन नसल्याने या १२ धनगरवाडयांना पाच किलोमीटर अंतरावरील पाण्याचे डबके वा लहानशा तलावामधून पाणी भरावे लागत आहे. पुरेशा पाण्याअभावी लहानग्यांपासून मोठ्यापर्यंत साऱ्यांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. सध्या पाण्याचे तीन टँकर धावत आहेत. यातील रस्ता असलेल्या धनगरवाडीमध्ये टँकर पोहोचत आहे. मे महिना संपेपर्यंत या वाड्या तहानलेल्याच राहणार आहेत.ग्रामीण भागात पाणीटंचाई मोठ्या प्रमाणावर जाणवू लागली आहे. यासाठी उपलब्ध पाणीसाठ्याचे नियोजन करण्यात आले असून, ही दाहकता आता नातूवाडी धरणातील पुरेशा पाणीसाठ्यामुळे कमी होणार आहे. खेड तालुक्यातील पिण्याच्या पाण्याबरोबरच शेतीसाठी लागणाऱ्या पाण्यासाठी प्राधान्य दण्यात येणार असून, पाणीपुरवठ्याबाबत चिंता करण्याचे कारण नसल्याचे नातूवाडी प्रकल्पाचे उपअभियंता मंगले यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले़ सध्या तालुक्यातील १९ गावे आणि ३० वाड्यांना प्रशासनाला पाणीपुरवठा करावा लागत आहे. त्यासाठी प्रशासनाकडे केवळ ३ टॅँकर उपलब्ध आहेत. यातील दोन शासकीय आणि एक खासगी टँकर आहे. टंचाईग्रस्त गावांना एकमेव नातूवाडी धरणातून पाणीपुरवठा होत आहे. या धरणाची क्षमता २८ दशलक्ष घनमीटर आहे. मात्र, या धरणामध्ये केवळ ८.००७ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा शिल्लक आहे. खेड तालुक्याच्या टंचाई आराखड्यातील ५० टक्के गावे व वाड्या आजही पाण्यापासून वंचित आहेत. त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत असून, जनावरे तडफडू लागली आहेत. धनगरवाड्या तर पाण्यासाठी भटकंती करत असून, येथील जनता पाण्याअभावी तडफडू लागली आहे. पाणीपुरवठ्यासाठी केवळ २ टँकरवर तालुक्याची मदार असल्याने प्रशासनाची पुन्हा एकदा बेफिकिरी समोर आली आहे.नातूवाडी धरणातील हे पाणी सध्या सुकिवली येथील चोरद नदीमध्ये सोडले जात आहे आणि तेथून हे पाणी टँकरच्या सहाय्याने टंचाईग्रस्त गावांना पुरविण्यात येत आहे. या धरणातून खेड शहराला करारानुसार होणारा ३० लाख लीटर पाण्याचा उपसा बंद करण्यात आला आहे़ त्यामुळे खेड शहराला सध्या खोपी पिंपळवाडी धरणातून पाणीपुरवठा होत आहे़ गतवर्षी शेतीला पाणी पुरविल्यानंतर १ मे रोजी याच धरणात ६ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा होता़ यावर्षी मात्र ८ दशलक्ष मीटर पाणीसाठा शिल्लक आहे़ २ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आम्ही वाचविला आहे़ पाण्याच्या उत्तम नियोजनामुळे हे शक्य झाल्याचे उपअभियंता मंगले म्हणाले़ नातूवाडी धरणातील पाणी शेतीला आणि पिण्यासाठी वापरण्यावर भर देण्यात आला असून, हे पाणी पूर्ण क्षमतेने पुरवण्यिात येत असल्याने कोणीही चिंता करण्याचे कारण नसल्याचे मंगले यांनी सांगितले आहे. नातूवाडी धरणाला समांतर असे शिरवली हे धरण आहे. मात्र, ते नादुरूस्त आहे. दुरूस्तीचे काम सुरू असल्याने या धरणातून होणारा पाणीपुरवठा बंद आहे. त्यामुळे तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी सर्रासपणे नातूवाडी धरणातील पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे.
रस्ते, वाटा, पाण्याची नकारघंटाच
By admin | Published: May 04, 2016 10:04 PM