पाचल : गेले तीन दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसाने पाचल परिसराला झोडपून काढले आहे. तळवडे-पाचल येथील अर्जुना नदीला मोठा पूर आला असून, परिसरातील मोऱ्या व रस्ते पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले असून, शेतीची कामेही ठप्प झाली आहेत.
पाचल परिसरात गेले तीन दिवस मुसळधार पाऊस पडत असून, नदी-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. पाचल-नारकरवाडी येथील मोरी पाण्याखाली गेली असल्याने येथील रहदारी व वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. अर्जुना धरणाचा सुमारे एक किलाेमीटर लांबीचा उजवा कालवा वाहून गेला आहे. कालव्याचे पाणी व माती शेतकऱ्यांच्या शेतात पसरल्याने मोठे नुकसान झाले आहे. पाचल-जवळेथर रस्ता पाण्याखाली गेल्याने या रस्त्यावरील वाहतूक काही काळ ठप्प होती. नदीकाठावरची शेती पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पाचल बाजारपेठेत नाल्याचे पाणी दुकानांत शिरल्याने काही व्यापाऱ्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. मात्र, सुदैवाने कुठेही जीवितहानी झालेली नाही.