जिल्ह्यातील सर्वच रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. काही रस्त्यांवर तात्पुरते पॅचवर्क आलेले होते. त्यावर लाखो रुपये खर्च करण्यात आले होते. मात्र, या खड्ड्यांमुळे पुन्हा केलेला खर्च पाण्यात गेलेला आहे. राष्ट्रीय महामार्ग, ग्रामीण व शहरी मार्गावरून दररोज वाहनांवर जाणाऱ्या वाहनचालकांना तसेच प्रवाशांना या रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे खूप त्रास सहन करावा लागत आहे. महामार्गावरील रस्त्यांची परिस्थिती पाहता मोठमोठे खड्डे पडल्याने वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे. खड्डेमय रस्त्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. मणक्याच्या आजाराबरोबरच सांधेदुखी, मानदुखीच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढत होत चालली आहे. रस्त्यावरील या खड्ड्यांमुळे गर्भवती महिलांना मोठा त्रास होत आहे. अनेक वाहनचालकांना कंबरदुखीच्या त्रासाशी झगडावे लागत आहे.
मुंबई-गोवा महामार्गाची सध्याची स्थिती फार बिकट आहे. अनेक ठिकाणी खड्डेमय रस्त्या आहे. रुंदीकरणाचे काम सुरू असलेल्या काही ठिकाणांवर सुरक्षारक्षकही नाही. शिवाय सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु आहे. त्यामुळे अपघातांना आळा घालण्यासाठी आणि नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि एनएचएआय या दोन्ही विभागांनी तात्काळ पावले उचलणे आवश्यक आहे. खड्ड्यांच्या ठिकाणी तातडीने डागडुजीसह रुंदीकरणाची कामे सुरू असलेल्या ठिकाणांवर अडथळे उभारावेत. जेणेकरून अपघात टळतील आणि लोकांचे जीव वाचतील. कोणाचा संसार उद्ध्वस्त होणार नाही. यासाठी काही तरी करण्यात यावे, अशी आपेक्षाही व्यक्त करण्यापलिकडे या दिवसांत काहीही करु शकत नाही.
रत्नागिरी जिल्ह्यात पावसाळ्यांच्या दिवसात रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते हा मोठा संशोधनाचा विषय बनला आहे. खड्डे बुजविण्यासाठी दरवर्षी लाखो रुपये खर्च करण्यात येतात. दरवर्षी गणेशोत्सवाच्या तोंडावर गणरायाच्या आगमनाच्या पूर्वी खड्ड्यांचा प्रश्न ऐरणीवर होतो. तो महामार्गावरच्या खड्ड्याचा सोडाच, शहरी आणि ग्रामीण भागातही ही ओरड सुरु होते. मात्र, सणासुदीचे दिवस गेल्यानंतर सर्वांनाचा त्याचा विसर पडला जातो. गणेशोत्सवाला काही दिवस असताना रस्त्यांवरील खड्डे भरण्यात येतात. ते लाल दगड, खडीचा वापर करण्यात येतो. मात्र, हा मुलामा काही दिवसांपुरताच टिकतो. त्यानंतर पुन्हा तेच खड्डे काही दिवसांतच दिसू लागतात. त्यामुळे खड्डे भरण्यासाठी केलेला खर्च पाण्यात जातो. हा दरवर्षीचा मुद्दा झालेला आहे.
दरवर्षी खड्ड्यांचे विघ्न टाळण्यासाठी कोणत्या उपाययोजनांची आवश्यकता आहे. तसेच खड्डे बुजविण्यासाठी कोट्यवधी रुपयांची उधळण करणाऱ्या यंत्रणावर कारवाई का होत नाही, असे अनेक प्रश्न आहेत. हे प्रश्न केव्हा आणि कोण सोडवणार, हा एक संशोधनाचा विषय बनला आहे.
रहिम दलाल