रत्नागिरी : विद्यार्थ्यांच्या सामाजिक जीवनात महाविद्यालयातील शैक्षणिक उपक्रमांची भूमिका मोलाची आणि महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन गोगटे- जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी केले.मुंबई विद्यापीठ आणि गोगटे - जोगळेकर महाविद्यालय आयोजित जिल्हास्तरीय उडान महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षपदावरून बोलत होते. सामाजिकरण ही व्यक्ती जीवनाची आवश्यकता असून, या प्रक्रियेच्या माध्यमातूनच व्यक्तीचे स्थान आणि दर्जा निश्चित होत जातात. या समाजात, शैक्षणिक संस्थांत सामाजिकरण घडवून आणणाऱ्या सहशैक्षणिक उपक्रमांचा सहभाग अधिक असेल तर त्या संस्थांतील विद्यार्थ्यांचे समाजजीवन उठावदार बनते. म्हणूनच विद्यार्थ्यांच्या सामाजिकरणात सहशैक्षणिक उपक्रमांची भूमिका जितकी मोलाची ठरते तितकीच ती महत्त्वाची ठरते, असेही ते म्हणाले. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सतीश शेवडे, मुंबई विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाचे सहसंचालक डॉ. कुणाल जाधव, कला शाखेचे उपप्राचार्य डॉ. अतुल पित्रे, आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाचे समन्वयक प्रा. तुळशीदास रोकडे उपस्थित होते.डॉ. सुखटणकर पुढे म्हणाले की, सहशैक्षणिक उपक्रमांतून मिळविलेल्या ज्ञानाच्या जोरावर आपणाला आपले व्यावसायिक निश्चित करणे शक्य होते. एवढेच नव्हे; तर ते यशस्वी करुन दाखविता येते म्हणून महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थ्याने एखाद्या तरी सहशैक्षणिक उपक्रमात सहभागी झालेच पाहिजे, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष व रत्नागिरी शिक्षण संस्थेच्या नियामक मंडळाचे सदस्य सतीश शेवडे म्हणाले की, आपण या समाजाचे घटक आहोत.यावेळी महाविद्यालयाच्या आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागमार्फत प्रकाशित होणाऱ्या ‘अस्मिता - एक विचार धारा’ या त्रैमासिकाचे प्रकाशन संपन्न झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तुळशीदास रोकडे यांनी केले.हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी विज्ञान शाखेचे उपप्राचार्य राजीव सप्रे, वाणिय शाखेचे उपप्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, सहशैक्षणिक उपक्रम प्रमुख श्रध्दा राणे, सहसमन्वयक डी. एस. कांबळे, एम. डी. राणी, शिवाजी उकरंडे, सचिन सनगरे, विद्यार्थी प्रतिनिधी केवल मलुष्टे, व्यवस्थापन प्रमुख ऋतुजा मलुष्टे, नेहा आंबर्डेकर, धृती सोनी, शिल्पा शेठ यांनी मेहनत घेतली. यावेळी विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. (प्रतिनिधी)मुंबई विद्यापीठाचा ‘उडान महोत्सव’ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न.जिल्ह्यातील १५ महाविद्यालयांतील ३०० विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग.दिवसभरात एकूण ११ पथनाट्यांचे सादरीकरण व निवडक ३० पोस्टर्सचे प्रदर्शन.यशस्वी आयोजनाबद्दल मुंबई विद्यापीठाचे विशेष अभिनंदनपत्र.आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाच्या ‘अस्मिता- एक विचार धारा’ या त्रैमासिकाचे प्रकाशन.
शैक्षणिक उपक्रमांची भूमिका मोलाची : सुखटणकर
By admin | Published: December 29, 2014 10:21 PM