खेड : कोरोनाच्या मुकाबल्यासाठी तालुक्यातील प्राथमिक शिक्षक विविध ठिकाणी ड्युटी निभावत आहेत. पंचायत समितीच्या आरोग्य विभागात ड्युटीवर असलेल्या प्राथमिक शिक्षकांना मंत्रालयातील कक्ष अधिकाऱ्याने अपमानास्पद वागणूक देत प्रशासकीय कारवाईची धमकी दिल्याप्रकरणी प्राथमिक शिक्षक समिती अध्यक्ष शरद भोसले यांनी चांगलेच धारेवर धरले. खडे बोल सुनावल्यानंतर कक्ष अधिकाऱ्याने दिलगिरी व्यक्त केली.
प्राथमिक शिक्षक विविध स्वरूपाची अशैक्षणिक कामे प्रामाणिकपणे करीत आहेत. मात्र, मंत्रालयातील कक्ष अधिकाऱ्याने त्यांना अपमानास्पद वागणूक देत प्रशासकीय कारवाई करण्याची धमकी दिली. या धमकीनंतर संबंधित शिक्षकाने अधिकाऱ्याची माफी मागूनही समाधान झाले नाही. ही बाब समजताच शिक्षक समितीचे तालुकाध्यक्ष शरद भोसले यांनी अधिकाऱ्याच्या केबिनमध्ये जाऊन जाब विचारला. यावेळी कक्ष अधिकाऱ्याने दिलगिरी व्यक्त करीत हा विषय येथेच थांबविण्याची विनंती केली. तसेच भोसले यांनी अधिकाऱ्याला असा गैरप्रकार पुन्हा न करण्याची तंबी दिली.