देवरुख : गेल्या दीड महिन्यांपासून दडी मारलेल्या पावसाने शुक्रवारपासून संततधार बरसायला सुरुवात केली. यामुळे वृक्ष उन्मळून पडण्याचे प्रकार संगमेश्वर तालुक्यात घडून आले. देवरुखमधील भर बाजारपेठेत जुनाट वटवृक्ष कोसळून पडल्याने तब्बल ४७ लाख ९ हजाराचे नुकसान झाले आहे.हा वृक्ष कोसळल्याने दोन मोटरसायकल, एक रिक्षा, १७ दुकानांबरोबर ५ हातगाड्या अशा २४ जणांचे प्रचंड नुकसान झाले आहे. याबाबतचा पंचनामा शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत करण्यात आला. यामध्ये परिसरातील तब्बल ४७ लाख ९ हजार रुपयाचे नुकसान झाल्याचे पंचनामा महसूल यंत्रणेमार्फत करण्यात आला आहे.हा जुनाट वटवृक्ष रस्त्याच्या मध्यभागीच आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या दुकानावर पडल्याने लोकांची वर्दळ थांबली होती. हा वृक्ष तोडून जेसीबीच्या सहाय्याने शुक्रवारी दुपारपासून ते शनिवारी सायंकाळपर्यंत पावसाची तमा न बाळगता देवरुखमधील तरूणांनी, व्यापाऱ्यांनी तसेच पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी हा वटवृक्ष बाजूला करुन मार्ग मोकळा करण्यासाठी प्रयत्न केले. भर पावसात आपला कामधंदा सोडून मदतीचा हात पुढे करणाऱ्या या युवकांचे देवरुख शहरातून कौतुक होत आहे.घटनेचे वृत्त कळताच देवरुखच्या तहसीलदार वैशाली माने, देवरुख पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डॅनियल बेन, उपनिरीक्षक विशाल रुमणे, महावितरणचे उपअभियंता रमेश कदम यांनी घटनास्थळी भेट दिली. संगमेश्वर तालुक्यात शुक्रवारी १४२.९१ मिमी इतका पाऊस पडला. या वादळी पावसाने देवरुख बाजारपेठेतील किशोर खवळे, अनंत सार्दळ, किशोर हेमसिंग, राजेंद्र शेट्ये, फैरोद मणेर, राजेंद्र केदारी, मनोहर देवरुखकर, पल्लवी धामस्कर, अमित चव्हाण, जितेंद्र चरकरी, दिपक देवरुखकर, दत्तात्रय ढवळे, हेमंत चव्हाण, नंदकुमार बोरुकर, अभिजीत चव्हाण, मंगेश चरकरी, संतोष केदारी यांच्या दुकानाचे, मेहबूब फुलारी यांच्या हातगाडीचे, रुपेश लोध यांच्या हातगाडी व मोटरसायकलचे नुकसान झाले आहे. मारुती माळी, अकबर पठाण, विजय कोरे यांच्या हातगाड्यांचे, रमेश गोपाळ यांच्या रिक्षाचे, तर संतोष मांगले यांच्या मोटरसायकलचे नुकसान झाले. (प्रतिनिधी)
वडाने केली ४७ लाखांची हानी
By admin | Published: July 13, 2014 12:28 AM