रत्नागिरी : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार दरवर्षीप्रमाणे २५ टक्के प्रवेश प्रक्रिया शुक्रवार, दि. ११ जूनपासून ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे. त्याची सोडत दि. ७ एप्रिल रोजी काढण्यात आली होती. ज्या विद्यार्थ्यांची आरटीईअंतर्गत निवड यादीत सोडत लागली आहे, त्या पालकांनी शाळेत जाऊन विहित मुदतीत प्रवेश निश्चित करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशाकरिता २० दिवसांचा कालावधी देण्यात यावा, अशी सूचना करण्यात आली आहे. कोरोनामुळे शासकीय नियमावलींचे पालन करीत पालकांनी शाळेत गर्दी करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
शाळांनी त्यांना आरटीई पोर्टलवर जी यादी प्राप्त झाली आहे त्या यादीतील पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठीची तारीख आरटीई पोर्टलवर द्यावी. ज्या बालकांना सोडत लागली आहे, त्यांच्या पालकांनी मूळ कागदपत्रे व छायांकित प्रती घेऊन शाळेत जाऊन आपल्या पाल्याचा तात्पुरता प्रवेश निश्चित करावा, असे सूचित करण्यात आले आहे.
शुक्रवार, दि. ११ जूनपासून शाळांनी पालकांना प्रवेशाकरिता पोर्टलवर दिनांक द्याव्यात. आरटीईअंतर्गत २५ टक्के ऑनलाईन प्रवेश सुरू झाले आहेत, अशा सूचना शाळेच्या प्रवेशद्वारावर लावाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव व लॉकडाऊन या कारणांमुळे जे पालक प्रत्यक्षरीत्या शाळेत प्रवेशासाठी येऊ शकत नाही, अशा बालकांच्या पालकांनी विहित मुदतीत दूरध्वनीद्वारे, ई-मेलद्वारे, किट्सअॅपद्वारे शाळेत संपर्क करून प्रवेशाची कार्यवाही पूर्ण करावी. निवड यादीतील विद्यार्थ्यांचा प्रवेश घेण्याचा कालावधी संपल्यानंतर शाळांमधील रिक्त जागांवर प्रतीक्षा यादीमधील विद्यार्थ्यांना अनुक्रमे प्राधान्य देण्यात येणार आहे.