अडरे : चिपळूण शहरातील कोरोना संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी चिपळूण नगरपालिकेच्या नागरी आरोग्य सुविधा केंद्रातर्फे शहरातील विविध प्रभागांमधील सात ठिकाणी वेगवेगळ्या दिवशी आरटीपीसीआर व ॲन्टिजन चाचणी मोहीम राबविण्यात येत आहे. नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.
कोरोना संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी प्राथमिक प्रभावी नियोजन म्हणून शहरात मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून म्हणजेच फिरत्या पथकाच्या माध्यमातून आरटीपीसीआर चाचणी सुरू करण्यात आली आहे. मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून विविध ठिकाणी ॲन्टिजन चाचणी सुरू आहे. तसेच भाजी मंडई व पवन तलाव मैदान येथे दोन स्वतंत्र केंद्र सुरू आहेत. नागरिकांनी येथे आपली तपासणी करून घ्यावी व आरोग्य अधिकाऱ्यांचा सल्ला घ्यावा, असे सांगण्यात आले आहे. लसीकरणाबाबत वेळोवेळी नागरिकांना लस उपलब्धतेनुसार माहिती दिली जात असल्याचे आराेग्य विभागाकडून सांगण्यात आले.