लोकमत न्यूज नेटवर्क
आवाशी : जिल्ह्यात वाढता संसर्ग पाहता यावर उपचार करणाऱ्या खासगी यंत्रणांनी जणू काही दुकानेच थाटली आहेत. आता तालुक्यातील काही खासगी लॅबमधून आरटीपीसीआर चाचण्या करण्यात येत आहेत. खेड तालुक्यातील लाेटे परिसरात खासगी लॅबमधून सुरू असणाऱ्या चाचण्यांना परवानगी आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
खेड तालुक्यातील लोटे - परशुराम औद्योगिक वसाहत ही खेड व चिपळूण तालुक्याच्या बाजारपेठेचा आर्थिक कणा मानला जातो. याचबरोबर या औद्योगिक वसाहतीमुळे लोटे - घाणेखुंट मिनी बाजारपेठेसह महामार्गावरील आवाशी, पिरलोटे, लवेल, दाभीळ ही गावे छोट्या बाजारपेठा म्हणून ओळखल्या जातात. साहजिकच रासायनिक कारखानदारीमुळे येथे विविध प्रकारचे आजार इथल्या स्थानिक रहिवाशांमध्ये आहेत. गंभीर स्वरूपाचे आजार वगळता इतर आजारांवर उपचार करण्यासाठी येथील आठ किलोमीटरच्या परिसरात अनेक डॉक्टर्सनी दवाखाने सुरू केले आहेत. रुग्णांवर जलदगतीने उपचार करण्यासाठी आता इथे काही खासगी लॅब सुरू झाले आहेत. लोटे प्राथमिक आरोग्य केंद्रासह शिव येथील आरोग्य केंद्रही पंचक्रोशीतील रहिवाशांवर उपचार करण्यासाठी सोईचे आहे. मात्र फुकट मिळणाऱ्या गोष्टींना किंमत नसते. त्याचप्रमाणे या पंचक्रोशीतील बहुतांश रुग्ण येथील खासगी दवाखान्यांमध्ये उपचार घेणे पसंत करतात.
प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना बाधितांवर आधी तपासणी करुन पुढील उपचारासाठी कामथे, कळंबणी किंवा जिल्हा रुग्णालयात जाण्याचा सल्ला देत असून लवेल येथे कोविड सेंटरही उभारण्यात आले आहे. मात्र अंगदुखी, भूक न लागणे, ताप येणे, मरगळ, दम लागणे अशा लक्षणांखाली असणारे रुग्ण येथील खासगी दवाखान्यात तपासणीसाठी जातात. मात्र तेथे गेल्यावर ही लक्षणे कोरोनाचीच आहेत. याची खात्री करून येथील काही डॉक्टर्स त्यांना आरटीपीसीआर करण्याचा सल्ला देऊन दवाखान्याजवळच असणाऱ्या खासगी लॅबमध्ये चाचणीसाठी पाठवत आहेत.
खासगी लॅबना आरटीपीसीआर करण्याची शासकीय यंत्रणेची परवानगी आहे का, की परवानगी नसतानाही खासगी लॅब अशा चाचण्या करू शकतात का? असा प्रश्न सध्या पंचक्रोशीतील काही जाणकारांकडून विचारला जात आहे. याबाबत खेडचे तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. मात्र याकामी तालुका वैद्यकीय अधिकारी व संबंधित वरिष्ठांनी लक्ष घालण्याची मागणी करण्यात येत आहे.