लांजा : काेराेनामुळे सरकारने गणेशोत्सवासाठी नियमावली तयार केली आहे; पण यातील गणपती मूर्तीच्या नियमात शिथिलता द्यावी, अशी मागणी लांजा युवक राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष चंद्रशेखर धावणे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी लांजा तहसीलदार समाधान गायकवाड यांच्याकडे दिले आहे.
या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, कोकणातील जनता आपल्या गणेशमूर्तीचे तीन ते चार महिने अगोदर आगाऊ बुकिंग करून ठेवत असतात. त्याप्रमाणे मूर्तीकाराने गणेशमूर्ती तयार करण्याचे काम पूर्ण केलेले असते. केवळ रंगकाम बाकी शेवट्याच्या महिन्यात करतात. शासनाने गणेश मूर्तीची उंची घरगुती मूर्ती २ फूट व सार्वजनिक मूर्ती ४ फूट असावी, अशा नियमावली केला आहे. या नियमामुळे मूर्तीकारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. कारण तयार केलेल्या मूर्तीचे काय करणार व त्या सर्व मूर्तीचे वर्षभर देखभाल करणे कठीण होऊ शकते. तसेच नागरिकांना नवीन मूर्ती घेण्याचा आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे. तसेच मूर्तींच्या उंचीच्या नियमामुळे नागरिकांना अधिकारी विनाकारण त्रास देऊ शकतात. त्यामुळे आपल्या सरकार विषय जनतेच्या मनात रोष निर्माण होऊ शकतो. त्यामुळे आपण या नियमांबाबत विचार करून शिथिलता करावी, अशी मागणी युवक तालुकाध्यक्ष बाबा धावणे यांनी केली आहे.
--------------------------------
गणेशमूर्तीच्या नियमावलीत शिथिलता देण्यासंदर्भात राष्ट्रवादी काॅंग्रेसचे लांजा तालुकाध्यक्ष चंद्रशेखर धावणे यांनी तहसीलदार समाधान गायकवाड यांच्याकडे निवेदन दिले.