मेहरून नाकाडे
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रवेशासाठी गणित व भौतिकशास्त्र विषय बंधनकारक नसल्याचे शासनाने जाहीर केले आहे. यामुळे ज्या मुलांना योग्य मार्गदर्शन लाभत नाही, शिवाय ग्रामीण भागातील ज्या विद्यार्थ्यांचे अभियंता होण्याचे स्वप्न आहे, ते नक्कीच पूर्ण होणार आहे. मात्र, अभ्यासक्रम शिकताना, मुलांना सखोल अभ्यास करावा लागणार आहे.
वास्तविक शासनाकडून नवीन शैक्षणिक धोरण राबविण्यात येत आहे. बारावी विज्ञान अभ्यासक्रम गणित, भौतिकशास्त्र विषय न घेता मुले पास होतात. मात्र, त्यांना अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण करावयाचे असते अशा मुलांसाठी जणू संधी प्राप्त झाली आहे. दहावीनंतर अकरावी, बारावीत गणित विषय नसल्याने अभियांत्रिकी अभ्यासक्रम शिकणे अवघड होणार आहे. मात्र, त्यासाठी संलग्न अभ्यासक्रम पूर्ण करावा लागणार आहे. अभियांत्रिकी शिक्षणानंतर नोकरीच्या संधी असल्याने या क्षेत्राकडे विद्यार्थ्यांचा ओढा अधिक असतो, मात्र चुकीच्या निर्णयामुळे प्रवेशाचा प्रश्न उद्भवतो, त्यांच्यासाठी शासनाने घेतलेला निर्णय चांगला आहे. शासन निर्णय जाहीर झाला असला तरी त्याबाबत मार्गदर्शक सूचना प्राप्त होणे अपेक्षित आहेत.
गणित शिकावेच लागणार
गणित, भौतिकशास्त्र दोन्ही विषय अभियांत्रिकी अभ्यासक्रमामध्ये महत्त्वपूर्ण आहेत. दहावीनंतर गणित नसतानाही अभियांत्रिकीचा अभ्यास करताना अप्लायड मॅथ्स शिकावे लागणार आहे. कमी वेळेत शिकण्यासाठी त्यांना जास्त वेळ तर द्यावा लागेल, शिवाय अधिक परिश्रम घ्यावे लागणार आहेत. आयटी, संगणक व तत्सम् अभियांत्रिकी अभ्यासक्रमानंतर रोजगाराच्या संधी असल्याने शासनाचा निर्णय होतकरू मुलांसाठी योग्य आहे.
गणित व भौतिकशास्त्र या दोन विषयांशिवाय अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्श्यांना अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेण्याच्या निर्णयामुळे सकारात्मक बदल होण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागातील हुशार व होतकरू विद्यार्थ्यांसाठी जणू संधी प्राप्त झाली आहे. मात्र अप्लायड मॅथ्सचा अभ्यास करावा लागणार आहे. त्यासाठी कमी वेळेत, अधिक परिश्रम घेऊन मुलांना यश मिळणार आहे. अभ्यासक्रमात होणारे नवीन बदल स्वीकारावे लागणार आहेत.
- डॉ. विनायक भराडी, आयटी विभागप्रमुख, फिनोलेक्स ॲकॅडमी
योग्य मार्गदर्शनाअभावी अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रवेश हुकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या नवीन निर्णयामुळे जणू नवी संधी उपलब्ध झाली आहे. मात्र अभियांत्रिकी शिक्षण घेताना भौतिकशास्त्र, गणित विषय शिकावेच लागणार आहेत. परंतु नवीन निर्णयामुळे अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेशासाठी अनेक जागा रिक्त राहतात. भविष्यात रिक्त जागेचा प्रश्न मार्गी लागेल. आयटी, संगणक व तत्सम क्षेत्रात रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहेत.
प्रा. मिलिंद किरकिरे, मेकॅनिकल विभाग प्रमुख फिनोलेक्स ॲकॅडमी