चिपळूण (जि. रत्नागिरी) : वडील रागावले म्हणून घर सोडून जंगलात निघून गेलेल्या अल्पवयीन मुलीला दुसऱ्या दिवशी पोलिसांच्या श्वान पथकातील ‘विराट’च्या मदतीने शोधून काढण्यात यश आले आहे. ही घटना अलोरे शिरगाव पोलिस स्थानकाच्या हद्दीत घडली.
एक अल्पवयीन मुलगी नेहमी आपल्या मित्रासोबत दुचाकीवरून शाळेत जात असल्याने तिचे वडील तिला रागावले. त्यामुळे घाबरून ती २८ सप्टेंबर रोजी सायंकाळी घरातून निघून गेली. ती पेढांबे येथील जंगलात गेल्याचा अंदाज होता. तिच्या वडिलांनी अलोरे शिरगाव पोलिस स्थानकात तक्रार दाखल दिली.
मुलीच्या शर्टच्या वासाने श्वानाने लावला माग
मुलीचे नातेवाईक आणि पोलिसांनी तिला शोधण्यासाठी जंगलात लगेचच शोधमोहीम राबवली. मात्र, त्या रात्री तिचा शोध लागला नाही.
शुक्रवारी सकाळपासून पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात आली. त्यालाही यश आले नाही. त्यामुळे अलोरे पोलिसांनी रत्नागिरी येथील श्वानपथकाची मदत मागवली.
श्वानपथकातील ‘विराट’ या श्वानाला मुलीच्या टी-शर्टचा गंध देण्यात आला. त्याच क्षणी त्याने पेढांबे येथील घनदाट जंगलात धाव घेतली आणि काही वेळातच त्याने पोलिस आणि नातेवाइकांना त्या मुलीच्या समोर नेऊन उभे केले. या मुलीचे समुपदेशन करून आणि तिची वैद्यकीय तपासणी करून तिला पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.
रात्र काढली जंगलातच
गुरुवारी रात्री घरातून निघून गेलेली मुलगी शुक्रवारी दुपारी चार वाजल्यानंतर सापडली. गुरुवारची रात्र तिने जंगलातच काढली, अशी माहिती पोलिसांनी दिली. बिबटे, विविध प्रकारचे साप यांचे जंगलात वास्तव्य असताना तिने रात्र कशी काढली असेल, हा प्रश्न अंगावर काटा आणणारा ठरत आहे.