मेहरून नाकाडेरत्नागिरी : राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात सध्या युरो ४ या व्हर्जनच्या गाड्या आहेत. या गाड्यांमुळे बीएस व्हर्जनच्या गाड्यांपेक्षा प्रदूषण कमी होत असले तरीही होणारे प्रदूषण हे आरोग्यासाठी धोकादायकच आहे. रत्नागिरी विभागात सध्या युरो ४ व्हर्जनच्या ८५२ गाड्यांचा ताफा असून, या गाड्या धूर ओकत असतात.दुचाकीवरून प्रवास करणाऱ्यांचे तसेच पादचाऱ्यांचे आरोग्य त्यामुळे धोक्यात येत आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या हितार्थ महामंडळाने एप्रिल २०२०पासून युरो ६ व्हर्जनच्या गाड्या आणण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे प्रदूषण टाळण्यासाठी अजून दोन वर्ष वाट पाहावी लागणार आहे.राज्य परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी मध्यवर्ती बसस्थानकातून ग्रामीण, लांबपल्याच्या गाड्या तसेच शहरी बसेस सोडण्यात येतात. तसेच वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे दुचाकीस्वारांनाही बरेचदा पुढे जाण्यासाठी रस्ता मोकळा मिळत नाही. परिणामी गर्दीतून मार्ग काढत जात असताना किमान दोन ते तीन किलोमीटरचा प्रवास हा धूर सोसतच करावा लागतो.राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात असलेल्या किमान ८ वर्ष व १२ लाख किलोमीटर धावलेल्या गाड्या रस्त्यावर सोडण्यात येत नव्हत्या. या गाड्या भंगारात काढण्यात येत असत. मात्र, ही मुदत वाढवून १० वर्ष व १२ लाख किलोमीटर करण्यात आली आहे. परंतु, दरवर्षी हे निकष बदलतच असतात.
युरो ४ व्हर्जननुसार एस. टी.चे आयुर्मान ८ ते ९ वर्षे धरले तरी पाच लाख १५ हजार किलोमीटर प्रवास केलेल्या एस. टी.च्या गाड्यातून धूर अधिक निघतो, त्यामुळे अधिक प्रदूषण होेते. रत्नागिरी विभागात ५० हजार ते पाच लाख किलोमीटर धावलेल्या १६३ गाड्या असून, साडेपाच लाख ते १० लाख किलोमीटर धावलेल्या ५२० तर दहा लाखपेक्षा अधिक किलोमीटर धावलेल्या ६९ गाड्या आहेत.फुफ्फुस व त्वचेसाठी धोकादायकगर्दीच्या ठिकाणी धूर ओकत धावणाऱ्या एस. टी.मुळे श्वसनाचे आजार, त्वचेचे विकार होण्याचा धोका वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. शहरात धावणाऱ्या या गाड्यांची क्षमता चढ चढण्याचीही नसते. तरीही बसचालक ही गाडी पूर्ण ताकदीनिशी चालवण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे या गाड्या चढावरून जात असताना काळा धूर सोडतात. यावेळी कार्बन मोनोक्साईड आणि कार्बन डायआॅक्साईड हे दोन गॅस बाहेर पडतात. ते फुफ्फुस व त्वचेसाठी धोकादायक आहेत.कार्बन मोनोक्साईड हानीकारकएस. टी.तून उत्सर्जित होणारा धूर मोठ्या प्रमाणावर कार्बन मोनोक्साईड आणि कार्बन डायआॅक्साईड सोडतो. यातील कार्बन मोनोक्साईड हा शरीरासाठी हानीकारक असून, हा गॅस फुफ्फुसात गेल्यामुळे श्वासनलिका आकुंचन पावते व श्वसनाचा त्रास होतो. या गॅसमुळे त्वचेवरही परिणाम होतो.प्रदूषण कमी करणाऱ्या एकूण १६३ एस्. टी.च्या गाड्या५० हजार ते एक लाख किलोमीटर धावलेल्या २६, दीड लाख ते दोन लाख प्रवास केलेल्या ७, दोन ते अडीच लाख किलोमीटर धावलेल्या २०, अडीच ते तीन लाख किलोमीटर धावलेल्या १४, तीन ते साडेतीन लाख किलोमीटर धावलेल्या २१, साडेतीन ते चार लाख किलोमीटर धावलेल्या ३०, चार ते साडेचार लाख किलोमीटर धावलेल्या १९, साडेचार ते पाच लाख किलोमीटर धावलेल्या २६ मिळून प्रदूषण कमी करणाऱ्या एकूण १६३ एस. टी.च्या गाड्या रत्नागिरी विभागाच्या सद्यस्थितीत ताफ्यात आहेत.
प्रदूषण होणारच नाहीप्रदूषण कमी करण्यासाठी एप्रिल २०१७पासून भारतात वाहनांसाठी युरो ४ या व्हर्जनचा वापर सुरू झाला. परंतु, यापुढे प्रदूषण होणारच नाही यासाठी युरो ६ हे व्हर्जन आणण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. एप्रिल २०२० पासून या व्हर्जनची वाहने भारतातील रस्त्यांवरून धावणार आहेत. नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठीच युरो ६ व्हर्जनचा एप्रिल २०२०पासून अवलंब केला जाणार आहे.- विजय दिवटे, यंत्रचालन अभियंता, विभागीय कार्यशाळा