रत्नागिरी : जिल्ह्यात गुरूवारपासून कडक लाॅकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. लाॅकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवेसाठी एस. टी. बसेस साेडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, अत्यावश्यक सेवेत नसतानाही एस. टी. महामंडळाचे वर्कशाॅप सुरू ठेवण्यात आल्याने नाराजीचा सूर उमटत आहे. वर्कशाॅपमधील अंतर्गत वादामुळे कर्मचाऱ्यांना वेठीस धरले जात असल्याने कर्मचाऱ्यांमधूनही या धाेरणाबाबत संतप्त भावना व्यक्त हाेत आहेत.
काेराेनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने गुरूवारपासून संपूर्ण जिल्ह्यात कडक लाॅकडाऊन जाहीर केले आहे. या लाॅकडाऊनमध्ये केवळ अत्यावश्यक सेवांनाच मुभा देण्यात आली आहे. लाॅकडाऊनमध्ये एस. टी. सेवाही बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी बसेस साेडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. लाॅकडाऊनमध्ये एस. टी. सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असला, तरी राज्य परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागाने त्यांच्या अखत्यारित येणारे वर्कशाॅप मात्र सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. गतवर्षी लाॅकडाऊनच्या काळात काेराेनापासून कामगारांचे संरक्षण हाेण्यासाठी वर्कशाॅप पूर्णपणे बंद ठेवण्यात आले हाेते. मात्र, गुरूवारपासून सुरू झालेल्या लाॅकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवेत नसतानाही वर्कशाॅप सुरू ठेवल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
औद्याेगिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या एस. टी.च्या वर्कशाॅपमध्ये दाेन सत्रात ५०-५० टक्के कर्मचाऱ्यांना कामावर बाेलावले जात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे ५० टक्के कर्मचारी उपस्थितीचा नियमही पायदळी तुडवला जात असल्याची चर्चा आहे. वर्कशाॅपमध्ये कार्यरत असणारे कर्मचारी एकत्रितपणे काम करत असल्याने साेशल डिस्टन्सिंगही पाळण्यात येत नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे येथील कर्मचाऱ्यांच्या आराेग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, वर्कशाॅपमधील अंतर्गत वादातून लाॅकडाऊनच्या काळात कर्मचाऱ्यांना कामावर बाेलावण्याचा निर्णय झाल्याची जाेरदार चर्चा सुरू आहे. रत्नागिरीतील एका लाेकप्रतिनिधीच्या सहकाऱ्यामार्फत वरिष्ठ अधिकाऱ्यांवर दबाव टाकून हे काम सुरू ठेवण्यात आल्याचीही चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. काेराेनाच्या काळात कर्मचाऱ्यांच्या आराेग्याशी न खेळण्याची मागणी करण्यात येत असून, याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची मागणी करण्यात येत आहे.
-------------------------
राजकारणात कर्मचाऱ्यांचा बळी
रत्नागिरीतील वर्कशाॅपमध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या निवडणुकीत एका गटाचा पराभव झाल्याने नवा वाद सुरू झाला आहे. त्यातूनच आता कर्मचाऱ्यांना वेठीस धरण्याचे प्रकार सुरू झाल्याची चर्चा सुरू आहे. पराभूत झालेल्या गटाच्या व्यक्तीकडून राजकीय दबाव आणण्याचे काम सुरू असल्याने कर्मचाऱ्यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.