रत्नागिरी-देवरूख गाडीत असे टायर ठेवण्यात आले होते. तर प्रवासी असे गर्दी करून उभे होते.
लाेेकमत न्यूज नेटवर्क
देवरूख : कोरोनाचे कारण देत रत्नागिरी-देवरूख मार्गावरील फेऱ्या कमी करण्यात आल्या आहेत. भारमान असूनही एस. टी. फेऱ्या नाहीत, अशी स्थिती या मार्गावर आहे. अनेक वेळा रत्नागिरीतील लोकल प्रवाशांमुळे देवरूखच्या प्रवाशांना गाडीत प्रवेश मिळत नाही. गुरुवारी तर निम्म्या एसटीच्या गाडीत टायर भरून नेण्याचा प्रकार घडला. यामुळे अनेक प्रवाशांना गाडीबाहेरच थांबावे लागले. प्रवासी उभे आणि टायर सीटवर, अशी स्थिती या फेरीत होती.
देवरूख डेपो काही ना काही कारणांनी चर्चेत येत आहे. गुरुवारी सायंकाळी ६ वाजता सुटलेल्या रत्नागिरी-देवरूख फेरीमध्ये संतापजनक प्रकार घडला. या गाडीमध्ये पाठीमागील सीटवर गाड्यांचे टायर ठेवण्यात आले होते. त्यामुळे प्रवाशांना बसण्यासाठी आसने उपलब्ध झाली नाहीत. याबाबत संतप्त प्रवाशांनी चालक, वाहकांना जाब विचारला. अनेक प्रवाशांना तर एस. टी.त प्रवेशच देण्यात आला नाही. आधीच फेऱ्या कमी, त्यात असे प्रकार घडल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला.
अनलॉक सुरू झाल्यानंतर एस. टी. ची सेवाही सुरळीत झाली; मात्र रत्नागिरी-देवरूख मार्गावर अनेक फेऱ्या रद्दच आहेत. एका बाजूने एस. टी. ला उत्पन्न नाही, अशी ओरड करायची आणि दुसऱ्या बाजूला प्रवासी असूनही फेऱ्या सोडायच्या नाहीत, अशी वस्तुस्थिती असल्याचे प्रवाशांनी सांगितले. कोणतीही पूर्वकल्पना न देता सायंकाळच्या सत्रात अनेक फेऱ्या रद्द केल्या जातात. त्यामुळे उपलब्ध गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.
रत्नागिरीतून सायंकाळी सुटणाऱ्या देवरूख गाड्यांमध्ये लोकल प्रवाशांचीही गर्दी हाेते. त्यामुळे देवरूख गाड्यांमध्ये देवरूखला जाणाऱ्यांना प्रवेशच मिळत नाही. सायंकाळी उशिरापर्यंत देवरूखच्या प्रवाशांना रत्नागिरीतील बस थांब्यांवरच थांबावे लागते. त्यात महिला, मुलींचाही समावेश आहे. प्रवासी असूनही एस. टी. फेरी नाही, असा प्रकार या मार्गावर सुरू आहे. याबाबत अनेकांनी आगार प्रमुखांकडे तक्रारी केलेल्या आहेत; मात्र याची दखल घेतली जात नाही. काही दिवसांपासून देवरूख आगारासाठी नवीन डेपो मॅनेजर रुजू झाले आहेत. त्यांनी तरी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.