देवरूख : मुंबई- गोवा महामार्गावरील संगमेश्वर बसस्थानकासमोर एस्. टी. बसला खासगी आरामबसने धडक दिल्याने शनिवारी सकाळी अपघात घडला. अपघातात एस्. टी. बस मधील २८ प्रवासी जखमी झाले असून यातील ६ जणांना अधिक उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. आराम बसचा चालक मात्र फरार झाला आहे.
संगमेश्वर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, अण्णाराव गणपती माने हे देवरूख- रेल्वेस्टेशन ही बस घेवून रेल्वेस्टेशनकडे जात होते. संगमेश्वर बसस्थानकातून बस रेल्वेस्टेशनकडे वळत असताना खासगी आराम बस (एमएच-०४, पी-५७३१) चालकाचे नियंत्रण सुटल्याने थेट एस.टी. बस ला धडक बसली. हा अपघात सकाळी ५.२० वाजता घडला. खासगी आराम बस मुंबईहून गोव्याच्या दिशेने जात होती.
खासगी आराम बसची एस.टी.च्या ड्रायव्हर बाजूने डीझेल टाकीजवळ धडक बसली. अपघाताची खबर एस. टी. बस चालक माने यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात दिली. अपघातात एस. टी.बस मधील २८ प्रवासी जखमी झाले आहे. जखमींमध्ये सुनंदा जाधव (७०, राजापूर), नारायण भालेकर (४५, करंबेळे), राजेश गोताड (६० करंबेळे), सानिका पवार (२५, हातीव), सुदेश पवार (३०, हातीव), संजना झेपले (१८, मुंबई), अशोक झेपले (५२, पूर), रमेश भालेकर (४०, देवरूख), संध्या जाधव (४०, बेलारी), अनिकेत झेपले (२६, देवरूख), महेंद्र जाधव (५४, बेलारी), सुरेश दळवी (३४, देवरूख), प्राजक्ता खेडेकर (२२, देवरूख), मयुरेश पवार (२६, हातीव), आरती झेपले (४०, देवरूख), अजय सावंत (४९, मुंबई), प्रमीला कदम (५०, ओझरे), सुरेश महाडीक (५३, मुरादपुर), सान्वी पवार (२५, हातीव), अरविंद लोवलेकर (५५, देवरूख), अशोक खेडेकर (५१, देवरूख), अस्मिता लोवलेकर (४७, देवरूख), सुमित्रा घोरपडे (७०, देवरूख), सुषमा जाधव (४७, बेलारी), अक्षता झेपले (४८, पुर), तेजस्वीनी कदम (२२, ओझरे), हेमलता मोहिते (२४, शिवने), तेजस्वीनी मोहिते (२२, शिवने) यांचा समावेश असल्याची माहिती संगमेश्वर ग्रामीण रूग्णालयातून उपलब्ध झाली आहे.
जखमींना तत्काळ नरेंद्रचार्य महाराज संस्थान नानीजच्या रूग्णवाहिकेतून चालक प्रसाद सप्रे यांनी संगमेश्वर ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. जखमींपैकी नारायण भालेकर, राजेश गोताड, रमेश भालेकर, संध्या जाधव, सुरेश दळवी, आरती झेपले यांना अधिक उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.अपघातानंतर भयभीत झालेल्या खासगी आराम बस चालकाने घटनास्थळावरून पलायन केले. संगमेश्वर पोलीसांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. खासगी आराम बस चालकावर संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास हे. कॉ. संतोष झापडेकर करीत आहेत.