रत्नागिरी : संचारबंदीमुळे लोकांचे घराबाहेर पडणे बंद झाले असून, त्याचा मोठा फटका एस. टी. वाहतुकीला झाला आहे. अत्यावश्यक सुविधा म्हणून एस. टी. सेवा सुरू ठेवण्यात आली असली तरी प्रवासीच नसल्याने भारमान मोठ्या प्रमाणात घटले आहे. त्याचा एस. टी.च्या अर्थकारणावर मोठा परिणाम झाला आहे.
शासनाने एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच कोरोनामुळे नियमावली जाहीर केली आहे. सुरुवातीला वीकेंड लाॅकडाऊन घोषित करण्यात आले होते. मात्र, दि. १५ एप्रिलपासून कडक नियमावली जारी करण्यात आली. अत्यावश्यक कारणाशिवाय जनतेला घराबाहेर पडण्यासाठी मनाई करण्यात आल्याने एस. टी.च्या प्रवासी भारमानावर परिणाम झाला आहे. गतवर्षी लाॅकडाऊन काळात एस. टी.ची चाके दोन ते अडीच महिने पूर्णत: थांबली होती. मात्र, प्रशासनाच्या परवानगीने टप्प्याटप्प्याने एस. टी. वाहतूक सुरू करण्यात आली. लाॅकडाऊनमुळे एस.टी.च्या उत्पन्नावर चांगलाच परिणाम झाला होता. याची झळ महामंडळ व महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना सोसावी लागली.
एस. टी.ची गाडी हळूहळू रुळावर येत असताना पुन्हा लाॅकडाऊनचा सामना करावा लागत आहे. प्रवासी संख्या विचारात घेऊनच संबंधित मार्गावरील वाहतूक सुरू आहे. भारमान शून्य असलेल्या मार्गावरील वाहतूक सध्या बंद ठेवण्यात आली आहे. एस.टी.च्या चालक-वाहकांना हजेरीसाठी आगारात यावे लागत असले तरी पन्नास टक्के उपस्थितीनुसार ड्युटी लावण्यात येत आहे. कोरोना संकट काळात प्रवासी वाहतुकीसाठी चालक वाहक तयार असतानाही प्रवाशांअभावी बहुतांश मार्गावरील फेऱ्या बंद ठेवल्या जात आहेत. उत्पादन घटले असल्यामुळे दैनंदिन खर्चही वसूल होणे अवघड बनले आहे. गतवर्षी एस. टी. कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न निर्माण झाला होता. यावर्षी गतवर्षीप्रमाणे काहीअंशी तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे एस.टी.च्या कर्मचाऱ्यांपुढे नवे संकट निर्माण झाले आहे.
लाॅकडाऊन पूर्वस्थिती
- एस.टी. गाड्या ६०० गाड्या
- दैनंदिन फेऱ्या ४ हजार २००
- किलोमीटर वाहतूक एक लाख ८० हजार
- प्रवासी वाहतूक दोन ते सव्वा दोन लाख
- उत्पन्न ५० लाख
लाॅकडाऊन काळातील स्थिती
- एस.टी. गाड्या ६०० गाड्या
- फेऱ्या २३२
- किलोमीटर वाहतूक १२ हजार ५५०
- प्रवासी वाहतूक दहा हजार
- उत्पन्न २ लाख १६ हजार ६००
कर्मचारी संख्या
एकूण चालक ९५५
वाहक ७६९
चालक कम वाहक १३६६
अन्य कर्मचारी १४१०
दोन दिवसांत पाऊण कोटीचा तोटा
दि.१० व ११ एप्रिल रोजी वीकेंड लाॅकडाऊन घोषित करण्यात आले होते. शनिवारी ६८१, तर रविवारी २०१ फेऱ्या संपूर्ण विभागात धावल्या. दोन दिवसांत अवघ्या ४२१४० प्रवाशांनी प्रवास केल्याने २४ लाख ६४३१ रुपयांचे उत्पन्न लाभले आहे. मात्र, दैनंदिन उत्पन्नाच्या तुलनेत दोन दिवसांत ७५ लाख ९३ हजार ५६९ रुपयांचा तोटा विभागाला सोसावा लागला होता.