लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावेळी मी खूप भावूक झाले होते. आमच्याकडे मोबाईलला रेंज नाही, त्यामुळे त्यांच्याबद्दल काय बोललं जातं, हे अद्याप माहिती नाही. त्यांचा आवाजच तसा आहे. त्यांनी अरेरावी केली नाही. त्यामुळे नेहमीप्रमाणे ते हातवारे करत बोलत होते. त्यातून लोकांचा गैरसमज झाला, अशी प्रतिक्रिया चिपळूण बाजारपेठेतील पानगल्ली येथील व्यापारी स्वाती भोजने यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी महापुराने उद्ध्वस्त झालेल्या चिपळूणमधील बाजारपेठेची पाहणी केली. यावेळी मुख्यमंत्र्यांना नुकसानभरपाईची विनवणी करणाऱ्या व्यापारी भोजने यांना शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी दमदाटी केल्याचा आरोप केला जात आहे. या आरोपानंतर विरोधकांनी जाधवांवर खरपूस टीका केली आहे. त्यानंतर आता चिपळूणमधील दमदाटीवर संबंधित महिलेने आपली प्रतिक्रिया देताना सांगितले की, शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी अरेरावी केलेली नाही. त्यांचा आवाज तसा आहे. तसेच अनेक वर्षांपासून त्यांचे आणि आमचे घरगुती संबंध आहेत. त्यांनी माझ्या मुलाला वडीलकीच्या नात्याने सांगितलं, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
याविषयी आमदार भास्कर जाधव यांनी सांगितले की, मला यावर काहीच बोलायचं नाही. लोकांना मदत करणे हाच माझा प्राथमिक हेतू आहे. कालही मला लोकांना मदत करायची होती. ती महिला माझ्या मुलीसारखी होती. तिच्यासोबत किंवा माझ्या नातू किंवा भाच्यासारख्या असणाऱ्या मुलासोबतही मी बोलायचं नाही आणि तेसुद्धा कोणत्या तरी प्रसारमाध्यमांना विचारुन बोलायचं असेल, तर काम करणे कठीण आहे. पण ज्यांनी मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यावरच सोशल मीडियावर लोक तुटून पडले आहेत. आपण त्यांना फार महत्त्व देत नाही. जे कोणी हे घडवलं आहे, त्याला योग्यवेळेला उत्तर देईन, असा इशाराही यावेळी त्यांनी दिला.
------------------
साफसफाईसाठी जाधव उतरले रस्त्यावर
महिलेवर अरेरावी केल्याप्रकरणी चर्चेत आलेल्या आमदार भास्कर जाधव यांनी पूरग्रस्त भागात पुन्हा जोमाने काम सुरू केले आहे. सोमवारी सकाळी २००हून अधिक माणसं घेऊन ते बाजारपेठेत आले. यावेळी येताना सोबत फावडे, घमेलही आणले होते. चिंचनाका येथूनच साफसफाई मोहीम सुरू केली. काही व्यापाऱ्यांच्या दुकानातील चिखल व कचरा टाकण्यास मदत केली. तसेच कचरा उचलण्यासाठी काही डंपरही आणले होते. या मोहिमेत नानासाहेब धर्माधिकारी संस्थेची माणसेही सहभागी झाली होती.