चिपळूण : सह्याद्री स्कूल आॅफ आर्ट, सावर्डे या महाविद्यालयातर्फे गेल्या २३ वर्षांतील चित्र शिल्प प्रदर्शनाच्या माध्यमातून कलेचे भांडार ९ सप्टेंबर रोजी जहांगीर आर्ट गॅलरी, मुंबई येथे उलगडणार आहे. सायंकाळी ५.३० वाजता आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ज्येष्ठ चित्रकार व कला समीक्षक प्रभाकर कोलते यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन होणार असल्याची माहिती सह्याद्री स्कूल आॅफ आर्टचे चेअरमन प्रकाश राजेशिर्के व प्राचार्य माणिक यादव यांनी पत्रकार परिषदेत दिली. कोणत्याही संस्कृतीला, समाजाला, प्रदेशाला, वास्तुला इतिहास असतो. असाच इतिहास कोकणातील सह्याद्री स्कूल आॅफ आर्ट सावर्डे या कला महाविद्यालयाला आहे. कोकणातील शैक्षणिक, सांस्कृतिक कलात्मक व सामाजिक बांधिलकी या गोष्टींचा सतत विचार करणारी सह्याद्री ही संस्था आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गोविंदराव निकम यांच्या संकल्पनेतून हे महाविद्यालय निर्माण झाले. सह्याद्रीच्या कुशीत सावर्डेच्या विलोभनीय निसर्गरम्य वातावरणात व षडऋतुंच्या सान्निध्यात आस्वाद घेत घेत विद्यार्थ्यांना कलेचे शिक्षण देणारे हे एकमेव महाविद्यालय आहे. ज्येष्ठ चित्रकार, शिल्पकार, निवृत्त प्राचार्य प्रकाश राजेशिर्के यांच्या मदतीमुळे महाविद्यालयाचे नाव देशभर पसरले आहे. कोकणातील कला जोपासण्याचे, ती वृद्धिंगत करण्याचे तसेच सुप्तावस्थेतील कलाकारांना उदयास आणण्याचे, त्यांना मार्गदर्शन करण्याचे कार्य कळत नकळत या महाविद्यालयाच्या माध्यमातून चालू आहे. यासाठी सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष शेखर निकम यांचे मार्गदर्शन लाभत आहे. यावेळी उद्घाटक चित्रकार कोलते यांच्याबरोबरच आंतरराष्ट्रीय कीर्तीची व्यक्ती चित्रकार वासुदेव कामत, सह्याद्री शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष अनुराधा निकम, कार्याध्यक्ष शेखर निकम, सचिव अशोक विचारे उपस्थित राहणार आहेत. या प्रदर्शनात स्वामी विवेकानंदांच्या विविध भावमुद्रा चितारणाऱ्या हेमलता ओतारीआई यांच्यासह अनेक मान्यवर चित्रकारांची चित्र उपलब्ध असणार आहेत. महाविद्यालयाला आतापर्यंत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेट देऊन कौतुक केले आहे. प्रदर्शनात आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार, शिल्पकार अशा नामवंत कलाकारांच्या दुर्मीळ कलाकृती पाहण्याची संधी कलारसिकांना मिळणार आहे. सर्व कलारसिक, कलाकार, विद्यार्थी, कला संग्रहाक यांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन चेअरमन राजेशिर्के व प्राचार्य यादव यांनी केले आहे. यावेळी पॉलिटेक्निकचे प्राचार्य मंगेश भोसले उपस्थित होते. या चित्रप्रदर्शनाचा लाभ घ्यावा (प्रतिनिधी)सध्याच्या आधुनिक कला शिक्षणाला जोड देताना आपल्या चित्र शिल्प महाविद्यालयावर सदैव प्रेम व मार्गदर्शन करणाऱ्या अत्याधुनिक फांड्री (ओतकाम केंद्र) करण्यासाठी चांगले संगणक, प्रोजेक्टर, साहित्य तसेच विविध प्रकारची टूल्स व युक्विपमेंट इत्यादी शैक्षणिक सुविधा, चित्रशिल्प महाविद्यालयाचे बांधकाम, पिण्याच्या पाण्यासाठी योग्य व्यवस्था, गरीब व होतकरु कला विद्यार्थ्यांसाठी कल्याण निधी उभारण्यासाठी कला संग्रहालयाचे, चित्र कलाकृतींची जहाँगीर कला दालन, मुंबई येथे ८ ते १४ सप्टेंबर या कालावधीत कला प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.ग्रामीण भागातील कलाकारांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न. दुर्मीळ कलाकृती पाहण्याची मिळणार संधी.नामवंत कलाकारांच्या कुंचल्यातून साकारलेली कलाकृती. २३ वर्षातील चित्र भांडार प्रदर्शनात मांडणार. चित्रकार, शिल्पकार समाजाचे प्रतिबिंब रेखाटतील.
सह्याद्री स्कूल आॅफ आर्टचे जहांगीर कला दालनात प्रदर्शन होणार
By admin | Published: September 05, 2014 10:52 PM