शिवाजी गोरेदापोली : दापोली येथील साई रिसॉर्ट प्रकरणी माजी मंत्री अनिल परब, तत्कालीन सरपंच सुरेश तुपे, विकास अधिकारी अनंत कोळी यांना अखेर जामीन मंजूर झाला. न्यायालयाच्या या निर्णयामुळे अनिल परब यांना मोठा दिलासा मिळाला आहे.खेड येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात हा अटकपूर्व जामीन मंजूर झाला. अनिल परब यांचे वकील अॅड. सुधीर बुटाला यांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला होता, त्यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने परब यांच्यासह तिघांना जामीन मंजूर केला. दापोली येथील साई रिसॉर्ट प्रकरणी ४२० अंतर्गत अनिल परब यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. ९ नोव्हेंबर रोजी अंतरिम जामीन मिळाला होता, त्यानंतर खेड येथील जिल्हा सत्र न्यायालयात परब यांच्या अर्जावर सुनावणी चालू होती. अखेर आज परब यांना दिलासा मिळाला.रत्नागिरी जिल्ह्यातील मुरुड समुद्र किनाऱ्यावरील वादग्रस्त साई रिसॉर्ट प्रकरणी दापोली पोलीस स्टेशनमध्ये अनिल परब, तत्कालीन सरपंच सुरेश तुपे, ग्राम विकास अधिकारी अनंत कोळी यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. दापोली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रुपा दिघे यांनी फिर्याद दिल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणावरुन माजी मंत्री आणि शिंदे गटाचे नेते रामदास कदम, माजी खासदार किरीट सोमय्या यांनी परबांना अटक करण्याची वारंवार मागणी केली होती.
साई रिसॉर्ट प्रकरण: माजी मंत्री अनिल परबांना मोठा दिलासा, अटकपूर्व जामीन मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2022 5:55 PM