राजापूर : पाण्याचा अंदाज न आल्याने खडकावर साखरीनाटे येथील नाैका आदळून दुर्घटनाग्रस्त झाल्याची घटना साेमवारी मध्यरात्री माडबन येथे घडली. खलाशांना त्या ठिकाणी असलेल्या अन्य होडीवरील खलाशांनी सुखरूपपणे बाहेर काढले. मात्र, या दुर्घटनेत सुमारे चार ते पाच लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
माडबन येथील समुद्र परिसरामध्ये मच्छीमारी करून दोन दिवसांपूर्वी साखरीनाटे येथील तमके यांची नाैका साखरीनाटे बंदरामध्ये रात्रीच्या वेळी येत होती. बंदरामध्ये येताना माडबन येथील दिशादर्शक लाइट हाउसचा प्रकाश मंद वा पुरेसा नसल्याने माडबन येथून पुढे साखरीनाटे बंदरामध्ये जाण्याच्या मार्गाचा योग्य अंदाज आला नाही. त्यातून ही नाैका माडबन येथे खडकावर जाऊन आदळली. हा अपघाता झाला होता तेव्हा त्या ठिकाणी अन्य नाैकाही होती. त्यावरील खलाशांनी सतर्कता दाखवत दुर्घटनाग्रस्त नाैकेमधील खलाशांना वाचविले. मात्र, या अपघातामध्ये नाैकेचे चार ते पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, माडबन येथे अपघात झालेली साखरीनाटे येथील तमके यांच्या मालकीची ही नाैका साखरीनाटे बंदरातील अन्य चार-पाच होड्यांच्या साहाय्याने ओढत साखरीनाटे बंदरामध्ये आणण्यात आली आहे. या ठिकाणी तिची आता दुरुस्ती करण्यात येणार आहे.
माडबन हाउस येथील प्रकाश कमी असल्याने हा अपघात कारणीभूत आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणेने त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी मच्छीमार नेते अमजद बोरकर यांच्यासह अन्य मच्छीमार बांधवांकडून केली जात आहे.