लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : वाशिष्ठी नदीपात्रातील गाळ उपसून नदीपात्र मोकळे करण्यासाठी जलसंपदा विभागाकडून तातडीने कार्यवाही व्हावी, यासाठी आमदार शेखर निकम यांनी मुंबई येथे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची गुरुवारी भेट घेऊन चर्चा केली. वरिष्ठ अधिकाऱ्यांसह लवकरच याविषयी बैठक घेऊन निर्णय घेऊ तसेच आपण स्वतः चिपळूणमध्ये येऊन पाहणी करू, असे आश्वासन पाटील यांनी दिले. चिपळूण पूरमुक्तीच्या दिशेने आमदार निकम यांनी टाकलेले हे महत्त्वपूर्ण पाऊल ठरले आहे.
२२ जुलै रोजी चिपळूणमध्ये महापूर आला आणि अख्खे चिपळूण उद्ध्वस्त झाले. त्याची विविध कारणे असली तरी वाशिष्ठी नदीपात्रात साचलेला भयंकर गाळ हे देखील एक प्रमुख कारण ठरले आहे. कोळकेवाडी ते चिपळूण शहर या दरम्यानचा नदीपात्रातील गाळ काढल्यास चिपळूण काही प्रमाणात पूरमुक्त होऊ शकतो. त्याचा पूर्ण अभ्यास आणि आराखडा तयार करून आमदार निकम यांनी थेट राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची गुरुवारी मुंबई येथे भेट घेतली. यावेळी त्यांच्याबरोबर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन कदम, अभियंता शहनवाज शहा, उद्योजक राम रेडीज उपस्थित होते.
गाळ काढण्यासंदर्भात यावेळी चर्चा करण्यात आली. कोळकेवाडीपासून चिपळूण शहरापर्यंत कसा आणि कोणत्या ठिकाणी नदीपात्र खोल करणे आवश्यक याबाबत संपूर्ण माहिती यावेळी देण्यात आली. तसेच त्यासाठी जलसंपदा विभागाच्या यांत्रिकी विभागाकडून अद्यावत यंत्रणा आवश्यक असून, ती उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावर पाटील यांनी सर्व माहिती घेत याबाबत लवकरच वरिष्ठ पातळीवर बैठक घेऊन निर्णय घेऊ तसेच चिपळूणमध्ये ५ किंवा ६ ऑगस्ट दरम्यान आयोजित महापूर परिषदेला आपण स्वतः उपस्थित राहणार आहे. त्यावेळी पाहणी करून पुढील कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन उपस्थितांना दिले आहे.