आॅनलाईन लोकमत
दापोली, दि. ३0 : दापोली तालुकयातील साकुर्डे-बांधतिवरे-वेळवी या रस्त्याचे नुतनीकरण व डांबरीकरणाचे काम सुरू आहे. २० वर्षांपूर्वी या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम करण्यात आले होते. तेव्हापासून ते आजपर्यंत या रस्त्याच्या दुरावस्थेकडे कोणीच लक्ष दिले नव्हते. सध्या या रस्त्याच्या नुतनिकरणाला व डांबरीकरणाला सुरुवात झाली आहे. परंतु हे सुरू असलेले काम हे अगदी निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
लक्षात आल्यावर साकुर्डे गावातील लोकांनी माजी उपसभापती उन्मेष राजे व सरपंच दिप्ती बैकर यांच्यासह प्रत्यक्ष रस्त्याच्या कामकाजाची पाहणी केली असता तेथे लोकांना डांबरीचा कमी वापर, माती मिश्रित खडीचा वापर, मोठे खड्डे, रस्ता समतल नाही अशा प्र्रकारचे रस्त्याचे कामकाज ठेकेदाराकडून चालू असल्याचे लोकांच्या निदर्शनास आले.
याबाबत माजी उपसभापती राजे व ग्रामस्थ यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग दापोली येथे जाऊन रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या होत असलेल्या कामाबाबत तक्रार केली. त्यावर संबंधीत अधिकारी यांनी ठेकेदाराला फोन करून काम थांबविण्यास सांगितले व विभागाचे अधिकारी आल्याशिवाय कामकाजाला सुरूवात करू नये असे सांगितले. त्यानंतर दुसरे दिवशी विभागाचा अधिकारी उपस्थित राहिल्यानंतर काम सुरू करण्यात आले व ग्रामस्थानी तात्पुरते समाधान व्यक्त केले. या रस्त्याचे काम हे २० वर्षानंतर होत असून ते चांगल्या दर्जाचे व्हावे हिच ग्रामस्थांची अपेक्षा आहे. सध्या या रस्त्याचे प्राथमिक स्वरूपाचे काम सुरू असून ते ठेकेदाराकडून चांगल्या दर्जाचे होईल याकडे साकुर्डेतील ग्रामस्थांचे शेवटपर्यंत लक्ष राहणार आहे. नाहीतर पुन्हा एकदा तिव्र आंदोलन करू असे मत ग्रामस्थांनी मांडले. (प्रतिनिधी)