रत्नागिरी : दि महाराष्ट्र स्टेट को-ऑप. मार्केटिंग फेडरेशनतर्फे शेतकऱ्यांकडून भात खरेदी करण्यात येते. आतापर्यंत जिल्ह्यातील १,०७९ शेतकऱ्यांनी १२,६९५.८५ क्विंटल भात विक्री केली आहे. भात विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर ऑनलाईन पैस जमा करण्यात येतात. त्यानुसार आतापर्यंत जिल्ह्यातील ४६७ शेतकऱ्यांच्या खात्यावर ९६ लाख ३२ हजार ६२२.२० रुपये जमा करण्यात आले आहेत.जिल्ह्यातील एकूण १४ केंद्रांवर भात खरेदी सुरू आहे. मार्च अखेरपर्यंत भात खरेदी सुरू राहणार आहे. विविध सहकारी सोसायटी, खरेदी-विक्री संघामार्फत भात खरेदी करण्यात येते. दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनतर्फे शासन ठरवून देईल, त्या दराने शेतमाल खरेदी करण्यात येतो. यावर्षी भातासाठी प्रतिक्विंटल १८६८ रुपये दर देण्यात येत आहे. २०१३-१४मध्ये विक्रमी प्रतिसाद लाभला होता. त्यावर्षी २४,४९८.४६ क्विंटल भाताची खरेदी झाली होती.दि महाराष्ट्र स्टेट को ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनतर्फे दरवर्षी शेतकऱ्यांकडून भात खरेदी करण्यात येते. शेतकरी स्वत:पुरता भात ठेवून अधिकची भात विक्री करत असल्याने भात विक्रीतून चांगले अर्थार्जन प्राप्त होते.
यावर्षीही भात खरेदी सुरू करण्यात आली असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे. भात विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँकेतील खात्यावर विक्रीची रक्कम तत्काळ जमा करण्यात येत आहे.- पी. जे. चिले,अधिकारी, दि महाराष्ट्र स्टेट को ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन, शाखा रत्नागिरी.