चिपळूण : बिबट्याच्या कातडीची विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी मुंबई - गोवा महामार्गावरील कामथे घाटात रंगेहाथ पकडले आहे. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करीत अटक करण्यात आली आहे.कामथे घाटात दोघेजण बिबट्याचे कातडे विक्रीसाठी येणार असल्याची माहिती येथील पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कामथे घाटात सापळा रचला. शुक्रवारी सायंकाळी ६.१५ वाजण्याच्या सुमाराला सावर्डेकडून चिपळूणच्या दिशेने येणारी संशयीत अलटो मारुती गाडी कामथे घाटात येऊन थांबली.
त्यानंतर दोघेजण गाडीतून बाहेर पडले. तोच सापळा रचून बसलेले पोलीस गाडीच्या ठिकाणी गेले आणि पोलिसांनी या दोघांकडे चौकशी करताना गाडीची तपासणी केली. यावेळी दोघांकडे बिबट्याचे कातडे सापडले.पोलिसांनी शासकीय पंचसमक्ष पंचनामा सुरू केला. दरम्यान, याची माहिती वन विभागाचे सचिन निलख यांना माहिती देण्यात आली. यानंतर या विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या कारवाईत दोघांकडून ३ लाख रुपये किमतीचे बिबट्याचे कातडे व ५० हजार रुपयांची गाडी असा ३ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आले