लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : महापुरामुळे चिखलमय झालेल्या चिपळूण बाजारपेठेत दुकानांची साफसफाई केली जात असतानाच कपडे, प्लास्टिक व स्टीलची भांडी विक्रीसाठी चिखलातच दुकाने मांडली आहेत. त्यामुळे बाजारपेठेत ग्राहकांची खरेदीसाठी गर्दी होऊ लागली असून, वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झाल्याने मदत कार्यात मोठी अडचण येत आहे.
महापुरात अवघी चिपळूण नगरी उद्ध्वस्त झाली. त्यातून एकही व्यापारी वाचलेला नाही. उलट दुकानातील मालासोबत फर्निचर व अन्य साहित्याचेही नुकसान झाल्याने व्यापारी जणू शून्यात आले आहेत. त्याच्याकडे काहीही राहिलेले नाही. त्यातच आता शासनाकडून तुटपुंजी भरपाई मिळाली तर येथील व्यापारी पुन्हा उभारी घेऊ शकत नाही.
पूरपरिस्थितीमुळे व्यापारी परिस्थितीपुढे हतबल झाले आहेत. अशा स्थितीत काही व्यापाऱ्यांनी चक्क चिखलमय नगरीतच कपडे, भांडीची दुकाने सुरू केली आहेत. कोणतीही वस्तू १०० रुपयांत अशी ओरडून ग्राहकांना आकर्षित करत आहेत. अनेक नागरिकांचे अतोनात नुकसान झाले असल्याने व पुरासोबत कपडे, भांडी वाहून नेल्याने ग्राहकांचाही त्याला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. मंगळवारी येथील बाजारपेठेत खरेदीसाठी मोठी गर्दी झाली होती. यावेळी चिंचनाका, भाजी मंडई व मुख्य बाजारपेठ रस्त्यावर गर्दी झाली होती.
----------------------
विमा कंपन्यांचे हात वर
दुकानात केवळ चिखल असून, त्यातील पुन्हा वापरात येणार नाही, अशी स्थिती आहे; मात्र आता विमा कंपन्यानीही हात वर करत असल्याने व नियमावर बोट ठेवत असल्याने व्यापारी आणखी अडचणीत आले आहेत. काही व्यापाऱ्यांना तर विमा अधिकारी तुम्ही मला उंचावर का ठेवला नाहीत, पॅकिंग माल धुवून पुन्हा वापरात आणा, अशा सूचना करत आहेत.
---------------------------
मदत कार्यात होतेय अडचण
सध्या बाजारपेठेत मदतीसाठी मोठी यंत्रणा दाखल झाली आहे. केवळ शासकीय नव्हे तर सामाजिक संस्थाही पुढे आल्या आहेत. अगदी कचरा उचलण्यापासून काम करीत आहेत. त्यासाठी वाहनेही काहींनी आणले आहेत; परंतु एकीकडे मदत कार्य सुरू असताना अचानक बाजारपेठेत गर्दी होऊ लागल्याने मदत कार्यात अडचण येऊ लागली आहे.