असगोली : सामाजिक बांधीलकी जपणारी पतसंस्था म्हणजे श्री समर्थ भंडारी नागरी पतसंस्था असल्याचे मत गुहागर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष राजेश बेंडल यांनी व्यक्त केले.
नगरपंचायतीने गुहागर भंडारी भवन येथे कोविड- १९ विलगीकरण कक्ष स्थापन केले आहे. यासाठी श्री समर्थ भंडारी नागरी पतसंस्था चिपळूण शाखा, गुहागर यांच्या वतीने या कक्षास कूलर वॉटर भेट म्हणून देण्यात आले. त्यावेळी नगराध्यक्ष बेंडल बोलत होते. यावेळी आरोग्य सभापती अमोल गोयथळे, पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर आरेकर, शाखाधिकारी राकेश गोयथळे, कर्मचारी संदीप राऊत, सौरभ गोयथळे, सुबोध महाडिक उपस्थित होते.
बेंडल पुढे म्हणाले की, गुहागर नगरपंचायतीने कोविड- १९ विलगीकरण कक्ष स्थापन केल्यानंतर समाजातील नागरिकांना यासाठी आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देऊन श्री समर्थ भंडारी पतसंस्थेने लगेचच आपली सामाजिक बांधीलकीचे भान ठेवून या कक्षासाठी चांगल्या दर्जाचे कूलर वॉटर दिले. श्री समर्थ भंडारी पतसंस्था फक्त फायद्याचाच विचार करत नाही, हे सिद्ध होते. गुहागर नगरपंचायत या पतसंस्थेची नेहमीच ऋणी राहील, असे शेवटी सांगितले.
--------------------------------
गुहागर कोविड- १९ विलगीकरण कक्षासाठी श्री समर्थ भंडारी नागरी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर आरेकर यांनी नगराध्यक्ष राजेश बेंडल यांच्याकडे कूलर वॉटर भेट दिला. सोबत आरोग्य सभापती अमोल गोयथळे. (छाया : मंदार गोयथळे)