लोकमत न्यूज नेटवर्क
मंडणगड : विभागीय वाहतूक नियंत्रक, रत्नागिरी यांनी जाहीर लिलावाद्वारे मंजूर केलेल्या मंडणगड बसस्थानकाच्या आवारातील ६ व्यावसायिक गाळ्यांचा प्रश्न गेल्या ४ दिवसांपासून चिघळत चालला आहे. यासंदर्भात मंडणगड नगरपंचायत व आगार व्यवस्थापन आपली जबाबदारी टाळत आहेत.
अनधिकृत मोटार केली जप्त
चिपळूण : शहरातील नगरपरिषदेची थकीत नळपाणी पट्टी मागणी करुनही न भरलेल्या नळधारकांवर ठोस कारवाई सुरु करण्यात आली आहे. आतापर्यंत शहराच्या विविध भागात २० ते २२ नळजोडण्या तोडण्यात आल्या आहेत. एका ठिकाणी इलेक्ट्रीक मोटरही जप्त करण्यात आली.
समस्यांच्या गर्तेत
दापोली : शासनाला मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळवून देणारे दापोलीतील दुय्यम निबंधक कार्यालय समस्यांच्या गर्तेत सापडले आहे. वरिष्ठ कार्यालयाकडे सुविधांची मागणी करुनही त्या पुरविल्या जात नसल्याने पक्षकारांच्या रोषाला या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना सामोरे जावे लागत आहे.
चिपळुणात वाढला उकाडा
चिपळूण : होळीच्या पार्श्वभूमीवर चिपळूणमध्ये उकाडा वाढला असून, तापमान ३० अंशांच्या वर गेले आहे. सकाळी ११ ते दुपारी ३.३० वाजेपर्यंत उन्हातून बाहेर पडणेही मुश्कील होत असल्याने थंडपेये आणि फळांच्या रसाला मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे.
कोरोनाची संख्या ३७ वर
खेड : तालुक्यात कोरोना बाधितांची भर पडल्याने एकूण संख्या ३७ झाली आहे. तालुक्यात ६ कंटेन्मेंट झोन ॲक्टिव्ह करण्यात आले आहेत. तालुक्यात आतापर्यंत रुग्णांची संख्या १,६१७ इतकी झाली आहे, तर ८० रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला असून १,५०८ जणांनी कोरोनावर मात केली आहे.
पाणी तपासणी झाले स्वस्त
रत्नागिरी : ग्रामीण जनतेला पुरविण्यात येणाऱ्या पाण्याच्या दर्जाबाबत विश्वास वृध्दिंगत करण्यासाठी व जनजागृतीसाठी सार्वजनिक पाणी तपासणी मोहिमेव्यतिरिक्त खासगी नमुने तपासणीला प्रोत्साहन देण्यात येणार आहे. त्यासाठी माफक दरात पाणी तपासणी सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे.
सहा गावांना करणार पाणी पुरवठा
देवरुख : गडगडी प्रकल्प डावा कालवा खोदाई कामाला श्रीफळ वाढवून अशोक जाधव यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. सहा गावांना पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. अशोक जाधव यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्याच्या शब्दावर काम चालू केल्याबद्दल पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी जाधव व पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांचे आभार मानले.
जिल्हा परिषद सदस्यांमध्ये नाराजी
रत्नागिरी : जिल्ह्यातील मंजूर झालेल्या कामांना प्रशासकीय मान्यता नसल्याने अनेक कामे अधांतरी राहिली आहेत. मार्चअखेर ही कामे कशी होणार, असा प्रश्न जिल्हा परिषद सदस्यांनी उपस्थित केला आहे. ही कामे मार्गी न लागल्यास पैसे परत जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
खेडमध्ये रास्त धान्याचे वाटप नाही
खेड : तहसील कार्यालयाच्या अन्नधान्य पुरवठा विभागामार्फत शहरासह ग्रामीण भागातील रास्त दर धान्य दुकानांद्वारे शिधापत्रिकाधारकांना दर महिन्याला वाटप केले जाणारे धान्य मार्च महिन्यात वाटप करण्यात येते. मात्र, मार्चचा पंधरवडा उलटला तरी अजूनही धान्य वाटप करण्यात आलेले नाही.