पृथ्वी प्रचंड तापते आहे. कुठे धुळींची भयाण वादळं उठत आहेत. बदमाष चीनसुद्धा त्यातून सुटलेला नाही. कोकणात पूर्वी ‘फयान’ नावाचं ओलं चक्रीवादळ आलं होते. मी त्या फयानला भयाण असंच म्हणायचो. जगाच्या रंगमंचावरचा हा वादळी काळ आहे.
पारंपरिक जीवन जगताना तुम्ही पर्यावरणाची इतकी प्रचंड उपेक्षा आणि ओरबड केली की ती आता माणूसजातीवर उलटली. तरीही सर्वत्र दिसतं ते मतांचं राजकारण, मतभेद, बोजवारा आणि दुर्बल सज्जनांचं, खऱ्या देशभक्तांचं मान खाली घालून दु:ख सहन करत जगणं!
कुठे जंगलाचा तुकडा शिल्लक असेल तर भविष्यात तोही नाहीसा होईल, अशीच भीती वाटते. कुठं नदी वाहती असेल तर एखाद्या मगरीचं प्रेत वाहून येईल, असे वाटत राहतं. मृत मगर हा फक्त त्यादिवशी बातमीचा विषय होतो. नंतर पुन्हा जैसे थे! शोषणाच्या इतक्या तऱ्हा समाजमाध्यमांमुळे समोर येतात की मन भयचकीत होतं.
- माधव गवाणकर, दापाेली