रत्नागिरी : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम आणि संतांचे काम सारखेच आहे. या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. हिंदू राष्ट्र घडवणे हा संतांचा आणि संघाच्याही कार्याचा उद्देश आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.नाणीज येथे जगतगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानतर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. संस्थानतर्फे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याचा गौरव करण्यात आला. डॉ. भागवत यांनी नरेंद्र महाराजांच्या हस्ते हा गौरव स्वीकारला.डॉ. भागवत म्हणाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संतांचे कार्य सारखेच आहे. जगाला दिशा देण्याचे काम भारताने करावे आणि त्यादृष्टीने भारत घडवणे हे कार्य संघ आणि संत करत आहेत. हिंदू राष्ट्र घडवण्यासाठी संघाचे कार्य सुरू आहे. कोणत्याही व्यक्तीच्या अंतरंगातून त्याच्या बाह्यरूपापर्यंतचा प्रवास हा संतांमुळे शक्य होतो. बाह्यरूपाकडून अंतरंगापर्यंतचा प्रवास घडवण्याचे कार्य संघाकडून केले जाते. माणसाच्या अंतर्बाह्य जागृतीतून सनातन धर्म कार्यरत व्हावा, यासाठीच प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे संघ आणि संघ या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. संघ भारतमातेची सेवा करतो. आईची सेवा करणे हे प्रत्येक मुलाचे काम आहे. त्यामुळे त्यासाठी कौतुक करून घेण्याची आवश्यकता नाही. मात्र संतांनी या कामाचे कौतुक करणे, त्यांनी पाठीवर थाप मारणे ही आमच्यासाठी प्रेरणादायी गोष्ट आहे. यातून अधिक काम करण्यासाठी आम्ही प्रेरित होऊ, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.संस्थानकडून झालेल्या गौरवामधील मानपत्र डॉ. मोहन भागवत यांनी स्वीकारले आणि संस्थानच्या वतीने संघाच्या कार्यासाठी देण्यात आलेला निधी मात्र त्यांनी तत्काळ संस्थानला परत केला.
संघ अन् संत एकाच नाण्याच्या दोन बाजू- मोहन भागवत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 3:47 AM