देवरुख : संगमेश्वर तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह होणाऱ्या रुग्णसंख्येत घट होत आहे. ही तालुक्यासाठी दिलासादायक बाब आहे. तालुक्यातील १७१४ रुग्ण आजपर्यंत बरे होऊन घरी गेले आहेत.
सोमवारी हाती आलेल्या अहवालानुसार सध्या ॲक्टिव्ह असलेल्या रुग्णांची संख्या ६९५ एवढी आहे. आजपर्यंत तालुक्यात एकूण २४०९ एवढे रुग्ण आढळले. त्यातील १७१४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
बरे होणाऱ्यांची संख्या दिलासा देणारी आहे. त्यामुळे तालुक्यातील जनतेने घाबरून न जाता स्वतःची काळजी घेऊन घरीच राहणे पसंत केले पाहिजे. गर्दी टाळल्यामुळे तसेच आरोग्य यंत्रणा आणि ग्रामकृती दलाच्या कामामुळेच सध्या रुग्णसंख्या घटत असल्याचे चित्र सध्या तालुक्यात दिसून येत आहे.
आतापर्यंत कोरोनाने मृत्यू झालेल्याची संख्या ७६ एवढी झाली आहे. तालुक्यात सोमवारी तिघांचा मृत्यू झाला आहे. तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांनुसार विचार केला तर साखरपा आणि कडवई या प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत जास्त मृत्यू झाले आहेत.