लोकमत न्यूज नेटवर्क
देवरुख : संगमेश्वर पंचायत समितीच्या उपसभापतीपदी शिवसेनेचे व फुणगुस गणातील परशुराम गोपाळ वेल्ये यांची सोमवारी बिनविरोध निवड झाली आहे. निवडीनंतर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.
सव्वा वर्षाचा कार्यकाळ संपल्यानंतर मावळत्या उपसभापती प्रेरणा कानाल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. यानंतर या रिक्त झालेल्या उपसभापती पदाकरिता सोमवारी निवडणूक कार्यक्रम घेण्यात आला. तहसीलदार सुहास थोरात यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. तर यावेळी त्यांना याकामी सहाय्यक म्हणून गटविकास अधिकारी नरेंद्र रेवंडकर यांनी काम पाहिले. उपसभापती पदाकरिता एकच अर्ज दाखल झाल्याने वेल्ये यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीदरम्यान सभापती जयसिंग माने, माजी सभापती सुजित महाडिक, सारिका जाधव, निधी सनगले, प्रेरणा कानाल, संजय कांबळे, अजित गवाणकर, वेदांती पाटणे, शीतल करंबेळे हे सदस्य उपस्थित होते.
पंचायत समितीच्या २८ व्या उपसभापतीपदाचा मान मिळविलेले परशुराम वेल्ये हे शिवसेनेच्या तिकिटावर ४१३१ मतांनी निवडून आले होते. त्यांनी परचुरी गावाचे सरपंचपद भूषविले होते. गावचा डोलारा हाती घेतल्यानंतर त्यांनी अनेक विकासकामे मार्गी लावत लाखो रुपयांचा निधी आणला आहे. तसेच सेना रुजविण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या या कार्याची दखल संघटनेने त्यांच्यावर उपसभापतीपदाची जबाबदारी सोपविली आहे.
निवडीनंतर रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या महिला संघटक नेहा माने, तालुकाप्रमुख प्रमोद पवार, सभापती जया माने, माजी आमदार सदानंद चव्हाण, महेश देसाई, दीपक शिंदे, आतिष पाटणे, प्रकाश घाणेकर यांच्यासह फुणगुस पंचक्रोशीतील सरपंच व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले.