देवरुख : संगमेश्वर तालुक्याला चक्रीवादळाचा मोठा फटका बसला आहे. या वादळामुळे संगमेश्वर तालुका दोन दिवस अंधारात राहिला. रविवारी सकाळपासून खंडित झालेला विद्युत पुरवठा सोमवारी रात्रीपर्यंत सुरू झाला नव्हता.
तालुक्याला जोडणाऱ्या ३३ केव्हीच्या मुख्य विद्युत वाहिनीत बिघाड झाल्याने तालुक्यातील पूर्णतः विद्युत पुरवठा खंडित झाला होता. वादळानंतर अनेक ठिकाणी झालेल्या घटना पुढे आल्या. त्यानंतर महावितरणचे कर्मचारी दिवस-रात्र हे तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्याचे काम करीत होते. वादळाचा वेग मोठा असल्याने अनेक ठिकाणी विद्युत वाहिन्यांवर तसेच वीज खांबांवर झाडे पडल्याने खांब तुटून पडले आहेत.
वादळामुळे पडलेली झाडे हटवून तसेच ठिकठिकाणी नवीन वीज खांब टाकण्यात आल्याशिवाय ग्रामीण भागातील वीजपुरवठा सुरू होणार नसल्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. मात्र, या वादळामुळे रविवारपासून सोमवारपर्यंत संगमेश्वर तालुकावासीयांवर अंधारातच राहण्याची वेळ आली आहे.
याबाबत महावितरण विभागाशी संपर्क साधला असता काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास काही वेळ काही भागातील विद्युत पुरवठा सुरू झाला होता. मात्र, तो काही वेळातच खंडित झाला. मात्र, मंगळवारी सकाळी काही भागातील विद्युत पुरवठा सकाळी सुरू करण्यात महावितरणच्या कर्मचाऱ्यांना यश आले.
--------------------------
संगमेश्वर तालुक्यातील करंबेळे सुतारवाडी येथे चार वीजखांब पडल्याने करंबेळे गाव तीन दिवस अंधारात आहे़ (छाया : सचिन मोहिते)