मार्लेश्वर : संगमेश्वर तालुक्यात गेले दोन दिवस मुसळधार कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे आंबा व काजू पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे आंबा व काजू बागायतदार धास्तावला आहे. अवकाळी पावसामुळे आंबा व काजू पिकाचा मोहोर गळून पडला आहे. परिणामी बागायतदारांची चिंता वाढली आहे.तालुक्यात गेले अनेक दिवस उन्हाच्या तडाख्याने नागरिक हैराण झाले होते. त्यातच ढगाळ व मळभी वातावरण असल्याने पावसाची शक्यता होती. अखेर शनिवारी व रविवारी अवकाळी पावसाने आपले जोरदार आगमन करीत दाणादाण उडवून दिली. अचानक कोसळलेल्या पावसामुळे नागरिकांची एकच धांदल उडाली, तर प्रचंड उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना एक प्रकारचा दिलासा मिळाला.दुसरीकडे आंबा व काजू पिकाला पोषक वातावरण असल्याने आंबा व काजूला चांगला मोहोर धरला होता. मोहोरामुळे आंबा व काजूची कलमे अक्षरश: फुलून गेली होती. यावर्षी मोठ्या प्रमाणावर मोहोर धरल्याने तालुक्यातील आंबा व काजू बागायतदार यंदा चांगले उत्पन्न मिळेल या आशेने आनंदात होते. मात्र, गेले दोन दिवस झालेल्या मुसळधार अवकाळी पावसामुळे आंबा व काजू पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. पावसामुळे मोहोर गळून पडल्याने आंबा व काजू बागायतदार चिंताग्रस्त बनला आहे. अवकाळी पावसाने बागायतदारांच्या आशेवर जणू विरजण टाकले आहे. अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याने आंबा व काजू बागायतदारांचा पुरता अपेक्षाभंग झाला आहे.संगमेश्वर तालुक्यात गेले दोन दिवस मुसळधार कोसळलेल्या ्अवकाळी पावसामुळे शेतकरी, बागायतदारांचे नुकसान होत ्आहे. तालुक्यात गेले अनेक महिने हे वातावरण असून त्याबाबत शेतकऱ्यांनी वेळोवेळी कृषिअधिकाऱ्यांकडे संपर्क साधला होता. मात्र, आता अधिक लक्ष देण्याची गरज आहे.(वार्ताहर)काजू पिकाला पोषक वातावरण असल्यामुळे यावर्षी चांगला मोहोर आला होता. काजू पिकातून चांगले उत्पन्न मिळेल, अशी आशा होती. गेले दोन दिवस झालेल्या मुसळधार अवकाळी पावसामुळे काजू पिकाचा मोहोर संपूर्ण गळून पडला असून, काजू पिकाचे प्रचंड मोठे नुकसान झालेले आहे. बागायतदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ आली आहे.- अशोक अणेराव,आंगवली, काजू बागायतदार
संगमेश्वरालाही पावसाने झोपडल
By admin | Published: March 03, 2015 9:11 PM