राजापूर : चिपळूण येथे आलेल्या महापुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशा परिस्थितीत अनेक मार्गाने मदतीचा ओघ सुरू आहे. यावेळी सामाजिक बांधिलकीच्या भावनेने तालुक्यातील नवेदर-कोंडसरमधील संघ स्वयंसेवक व ग्रामस्थांनी चिपळूण येथे जाऊन पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला.
या पूरग्रस्तांना धान्य, पाणी तसेच जीवनावश्यक वस्तूंचा अनेक मार्गाने पुरवठा होत आहे. परंतु, परिसरातील अनेक घरे ही चिखलात माखलेली आहेत. ही गरज ओळखून नवेदर, कोंडसर येथील संघ स्वयंसेवक व ग्रामस्थ एकत्र येऊन मदत करण्यासाठी चिपळूणला गेले. गावातून जाताना घरे साफ करण्यासाठी पंप, जनरेटर, पाण्याच्या टाक्या व आवश्यक अवजारे घेऊन चिपळूण-मार्कंडी परिसरातील काही घरांची स्वच्छता केली. तसेच सोसायटींमधील चारचाकी वाहने टोइंग करण्यासाठी मदत पुरवली.
यामध्ये जिल्हा प्रचार प्रमुख दक्षिण रत्नागिरी रवींद्र भेवड, बाळ दाते, अजित दावडे, अण्णा तलये, प्रसन्न दाते, विकास सावरे, संतोष गोराठे, निवृत्ती गोराठे, मंदार पांचाळ, संजय पड्यार, अनिकेत ठुकरूल, भाई फणसे, संजय दाते, वरद गोरे यांनी सहभाग घेतला हाेता.