देवरुख : केंद्र शासनाच्या जलशक्ती अभियानांतर्गत जलशक्ती अभियान आठवडा - शोषखड्डा राबविण्याबाबत राेजगार हमी याेजनेच्या आयुक्तांनी केलेल्या आवाहनानुसार संगमेश्वर तालुक्यातील सांगवे गावाने लाॅकडाऊनच्या काळात शाेषखड्डे बांधण्याचे उद्दिष्ट १०० टक्के पू्र्ण केले आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करणारे सांगवे जिल्ह्यातील पहिले गाव ठरले आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, गटविकास अधिकारी नरेंद्र रेवंडकर, सहायक गटविकास अधिकारी दीप्ती गाट यांच्या मार्गदर्शनाखाली संगमेश्वर तालुक्यातील १२६ ग्रामपंचायतींमधून सांगवे गावाची निवड करण्यात आली आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत पंचायत समिती संगमेश्वरचे ‘नरेगा’चे सर्व अधिकारी, कर्मचारी, सहायक कार्यक्रम अधिकारी प्रथमेश नलावडे, तांत्रिक अधिकारी वैभव सुर्वे, वैभव दाभोळकर, ग्रामपंचायत सांगवेचे सरपंच देवदत्त शेलार, ग्रामविकास अधिकारी एम. आर. कांबळे, ग्राम रोजगार सेवक पूजा शेलार यांनी, गटविकास अधिकारी यांची १०० टक्के शोषखड्डा निर्मिती ही संकल्पना प्रत्यक्षात अंमलात आणण्यासाठी संपूर्ण सांगवे ग्रामस्थांनी सहकार्य केले.
तालुक्यातील मौजे सांगवे गावाने शासनाच्या प्रत्येक योजनेत सहभाग घेऊन नावीन्यपूर्ण काम सातत्याने केले आहे. त्यामुळे तालुका, जिल्हा, कोकण विभाग व राज्य स्तरावर प्रथम येऊन पुरस्कार मिळविले आहेत. या पद्धतीने शासनाच्या विविध योजना व अभियानामध्ये सहभागी होऊन १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सातत्याने नेहमी प्रयत्न करत सांगवे ग्रामपंचायत आपली परंपरा कायम ठेवत आहे.