दापोली : सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र या संस्थेच्या दापोली, मंडणगड आणि खेड विभागांच्या समूहाने किल्ले पालगड येथे स्वच्छता मोहिमेचे आयोजन केले होते. या मोहिमेमध्ये गडावरील टाके व गड परिसराची स्वच्छता करण्यात आली. पाण्याच्या टाकीतील माती काढून त्या स्वच्छ करण्यात आल्या. झाडेझुडपे तोडून परिसरही स्वच्छ केला गेला.
सराफांचे नुकसान
रत्नागिरी : साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेल्या गुढीपाडव्यादिनी लॉकडाऊनमुळे सराफांंची दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नागरिक सोन्याची तसेच इतर वस्तूंची खरेदी मोठ्या प्रमाणावर करतात. मात्र यावेळी लॉकडाऊनमुळे ही खरेदी थांबली आहे.
अवकाळी पावसाचा धोका
रत्नागिरी : राज्यासह कोकणात कोरोनाचे संकट वाढू लागले असतानाच आता निसर्गानेही अवकृपा करण्यास सुरुवात केली आहे. अधूनमधून पडणाऱ्या अवकाळी पावसाने बागायतदारांची चिंता वाढवली आहे. १२ ते १४ एप्रिल या कालावधीत जिल्ह्यात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
रस्ते झाले धोकादायक
रत्नागिरी : शहरात आता काही ठिकाणी रस्त्याच्या मध्यभागी चर काढले आहेत. हे चर जाड्या दगडाने भरले जात आहेत. मात्र, त्यामुळे दुचाकींना मोठ्या प्रमाणावर धोका निर्माण झाला आहे. शहरात अनेक भागात यावरून दुचाकी घसरून अपघाताचे प्रमाण वाढले आहे.
लॉकडाऊनचा धसका
देवरुख : १४ एप्रिलनंतर कोणत्याही क्षणी पूर्णत: लॉकडाऊन लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे लॉकडाऊन झाल्यास सर्व व्यवहार ठप्प होतील या भितीने नागरिक आर्थिक तसेच अन्य कामे घाईघाईने करू लागले आहेत. गैरसोय होऊ नये यासाठी सर्व गृहोपयोगी वस्तूंचा घरात साठा करून ठेवण्यासाठी लोकांची धावपळ सुरू आहे.
रस्ता डांबरीकरणाची मागणी
दापोली : तालुक्यातील कुटाचा कोंड ते टेटवली रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या रस्त्यावरून वाहने चालविताना चालकांची कसरत होत आहेत. याकडे संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती तातडीने करून डांबरीकरण करण्यात यावे. तसेच मोठमोठे खड्डे बुजवावेत, अशी मागणी करण्यात येत आहे.
मार्गाचे काम रखडले
देवरुख : तळेकांटे देवरुख या मार्गाचे काम सुरू आहे. मात्र, हे काम गेल्या सात ते आठ महिन्यांपासून धिम्या गतीने करण्यात येत आहे. सध्या या मार्गावर मोठ्या प्रमाणावर धूळ पसरली आहे. त्यामुळे नागरिकांना त्रासदायक होत आहे. हे काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशी मागणी प्रवासी करीत आहेत.
माठांना मागणी
देवरुख : गरिबांचा रेफ्रिजरेटर समजल्या जाणाऱ्या माठांना आता ग्रामीण भागात मागणी वाढू लागली आहे. सध्या माठ विक्रेते मोठ्या प्रमाणावर दाखल झाले आहेत. राजस्थानी माठांवर डिझाईन असल्याने नागरिक या माठांना पसंती दर्शवित आहेत. सध्या या माठांची विक्री वाढली आहे.
रस्ता कामाला मंजुरी
खेड : तालुक्यातील दुर्गम भागात वसलेल्या खवटी धनगरवाडी रस्त्यासाठी १० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे आता या दुर्गम वाडीच्या दळणवळणाचा प्रश्न सुटणार आहे. हा रस्ता झाल्यास या ग्रामस्थांची पाण्याची तसेच विजेचीही गैरसोय दूर होणार असल्याने या ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.
व्हाया बसफेरीची मागणी
दापोली : आंजर्लेकडून पाडले, आडे, केळशीकडे जाणारा मार्ग नादुरुस्त झाला आहे. त्यामुळे या मार्गावरून जाणारी एसटी बसफेरी बंद झाली आहे. त्यामुळे या परिसरातील प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. प्रवाशांची गैरसोय लक्षात घेऊन आंजर्ले गाव व्हाया एसटी बसफेरी सुरू करण्यात यावी अशी मागणी नागरिक करीत आहेत.