गणपतीपुळे : गणपतीपुळे येथील ग्रामस्थ किशोर गुरव व त्यांचे गावातील इतर सहकारी यांनी गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. या माेहिमेमुळे किनारा परिसर स्वच्छ झाला आहे.
कोरोनामुळे स्वयंभू श्रींचे मंदिर बंद असल्यामुळे गणपतीपुळे किनाऱ्यावरील सर्व उद्योग, व्यवसाय बंद आहेत. समुद्रकिनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात पालापाचोळा, प्लास्टिक व काचेच्या बाटल्या, थर्माकोल, झाडांच्या फांद्या आधी कचरा मोठ्या प्रमाणात आला आहे. मंदिर बंद असल्यामुळे चौपाटीकडे व चौपाटीच्या साफसफाईकडे कोणीही फारसे लक्ष देत नाही. ही बाब लक्षात घेऊन किशोर गुरव यांनी उत्तम सुर्वे, प्रथमेश सागवेकर, विजय सांबरे आदी सहकाऱ्यांच्या सहाय्याने गणपतीपुळे किनाऱ्यावर स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे.
लॉजिंग व्यवसाय बंद असल्यामुळे रिकामा वेळ कुठे उपयोगात आणावा, यासाठी हा प्रयत्न केला आहे. मला सहकारीही चांगली साथ देत आहेत. स्वयंभू गणपती मंदिरापासून एमटीडीसी बांबू हाऊसपर्यंत दररोज सकाळी ७ ते १२ यावेळेत काम करून संपूर्ण चौपाटी साफ करण्याचा मानस आहे. या मोहिमेत सहभागी होण्यासाठी गावातील काही ग्रामस्थांनी इच्छा व्यक्त केली असून, लवकरच गणपतीपुळेतील स्वच्छता मोहीम पूर्ण होईल, असे किशोर गुरव यांनी सांगितले.