लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : रत्नागिरी पंचायत समिती सभापतिपदाची निवड बिनविरोध झाली असून, सभापतिपदी वाटद पंचायत समिती गणातील सदस्या संजना माने यांची निवड झाली आहे.
रत्नागिरी पंचायत समिती सभापतिपद निवड प्रक्रिया जिल्हा परिषदेच्या लोकनेते कै. शामराव पेजे सभागृहात मंगळवारी आयोजित करण्यात आली होती. माजी सभापती प्राजक्ता पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर नवीन सभापती निवडीसाठी शिवसेनेत इच्छुकांची संख्या मोठी होती. मात्र, सभापती पद खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव होते. सभापतिपदासाठी इच्छुकांमध्ये शिवसेनेकडून वाटद गणातील सदस्या संजना माने, कुवारबावमधील जयश्री जोशी, हातखंबातील साक्षी रावणंग, फणसवळेतील आकांक्षा दळवी, गोळपमधील प्रेरणा पांचाळ यांची नावे चर्चेत होती.
निवड प्रक्रियेवेळी उमेदवारी अर्ज भरण्याच्या मुदतीत सकाळी शिवसेनेतील सदस्यांमधून संजना माने यांचा एकमेव उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विकास सूर्यवंशी यांच्याकडे सादर करण्यात आला होता. सभापतिपदाची निवड दुपारी २.३० वाजता घोषित करण्यात आली. सभापती निवडीवेळी शिवसेनेचे ज्येष्ठ सदस्य गजानन पाटील, उपसभापती दत्तात्रय मयेकर, माजी सभापती प्राजक्ता पाटील, सदस्य अभय खेडेकर, सुनील नावले, उत्तम सावंत, उत्तम मोरे, विभांजली पाटील, मेघना पाष्टे उपस्थित होते. उपसभापती पदासाठी लवकरच निवड प्रक्रिया होणार असून, त्यासाठी सदस्य उत्तम सावंत यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.